वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दर रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्युचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढला आहे. त्यामुळे रविवारी ( दि.१४) लोहारा शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यु होता. याला व्यापारी, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे दिवसभर सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता.
डिसेंबर २०२० पासून कोरोना रुग्णांची संख्या तुरळक झाली होती. त्यामुळे कोरोना संपला असा समज करून घेऊन नागरिकांनी प्रशासनाकडून सांगण्यात आलेले कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले. एवढा गंभीर आजार असूनही नागरिकांना त्याचे काहीही गांभीर्य असल्याचे दिसून येत नव्हते. मास्क, सॅनिटायझर चा वापर बहुतांश नागरिक करीत नव्हते. तसे चसार्वजनिक ठिकाणी जाताना आवश्यक ती काळजी घेतली जात नव्हती. परिणामी मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या परत एकदा हळू हळू वाढत चालली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता रविवारच्या जनता कर्फ्युला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे लोहारा शहरात सकाळपासून शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान जनता कर्फ्यु यशस्वी होण्यासाठी पोलीस, नगरपंचायत प्रशासनाकडून आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली होती. प्रशासनाने दर रविवारी जनता कर्फ्यु ठेवला आहे. तसेच इतर दिवशीही काही निर्बंध घातले आहेत. तरीही या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून मास्कचा नियमित वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी जाताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.