लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व १४ दरवाजे रविवारी (दि.२६) सकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दोन दिवसांपूर्वी अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला होता. त्यातच शनिवारी रात्री हा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर होता. रविवारी पहाटे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या उपस्थितीत ४ दरवाजे ०.१० मीटरने उघडून तेरणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु पाण्याचा येवा वाढत असल्याने काही वेळाने प्रकल्पाचे ८ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर काही वेळाने प्रकल्पाचे सर्व १४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. याबाबत नदीकाठच्या गावांना तलाठी यांचे मार्फत दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून माकणी ते लातुर व सास्तुर ते गुबाळ रस्ता वाहतुकीसाठी पहाटे पाच वाजल्यापासुन पुर्णपणे बंद केला होता. तेरणा नदीवरील पुलाच्या वरुन पाणी वाहत आसल्याने लातुर औसा निलंगा आगाराच्या बसेस दिवसभर बंद यासल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. लोहारा तहसील कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभागने पहाटेपासूनच तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना सूचना देऊन वाहतुकीची रस्ता बंद करण्यात आला आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्तासह प्रशासनाचे पथक तैनात केले आहे. धरणा शेजारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.