वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्राम पंचायत कार्यालयामध्ये वाढत्या कोरोना महामारी संदर्भात रविवारी ( दि.१८) बैठक घेण्यात आली. कोरोना या संसर्गजन्य आजाराला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा झाली. माकणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. यामुळे येथे कोरोनाची टेस्ट करण्यात येत आहे. यावेळी गावात कोरोनाचे अनेक पेशंट निघत आहेत. गावातील पाँझिटिव्ह निघालेल्यांची संख्या दिवससेंदिवस वाढत आहे. अनेकांना लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना वेळेवर बेड,औषधी, उपलब्ध होत नाहीत. यामुळे गावातच कोरोना पेशंटची सोय व्हावी या हेतूने लोकसहभागातून २५ बेडची व्यवस्था व आँक्सिजनची व्यवस्था जिल्हा आरोग्य अधिकारी हनुमंत वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गोविंद साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे असे मत सरपंच विठ्ठल साठे यांनी या बैठकीत मांडले. माकणी येथील सर्व शाळेतील मुख्याध्यपक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य घेणार आहे. तसेच गावातील नागरीकांनी कोरोनाची लस घ्यावी व जे नागरीक लस घेत नाहीत त्यांना लस घेण्यास प्रेरीत करावे व आशा कार्यकर्ती व अंगणवाडीच्या कार्यकर्ती यांनी घरोघरी जाऊन कोण लस घेतली, कोण नाही याचा सर्व्हे करावा. तसेच कोणाला बरे वाटत नसेल तर त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी सांगावे अशा सूचना सरपंच विठ्ठल साठे यांनी या बैठकीत केल्या. वैद्यकीय अधिकारी माने मँडम यांनी यासाठी सर्वोतपरी मदत करण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीसाठी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रा.प.सदस्य गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, अभिमन्यु कुसळकर, बाळू कांबळे, वैद्यकीय अधिकारी माने मँडम, ग्रामविकास अधिकारी जगताप साहेब, सर्व आशा कार्यकर्त्या, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.