वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे माझे गाव, कोरोनामुक्त गाव या अभियानाला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात मंगळवारी ( दि. २०) ग्रामपंचायत कार्यालयात बैठक संपन्न झाली.
तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात माझे गाव, कोरोनामुक्त गाव या अभियानासंदर्भात बैठक घेऊन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. माकणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी सास्तुरचे सरपंच यशवंत कासार, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, निवासी अपंग शाळेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, ग्रामविकास अधिकारी डी. आय. गोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कर्मचारी उपस्थित होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद शाळा, शांतेश्वर प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, तसेच आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांची ग्राम कोरोना पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक पर्यवेक्षकाला ४० घरांची जबाबदारी देण्यात आली आहे. स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी सर्व ग्राम कोरोना पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य फजल कादरी यांनी केले. सुत्रसंचालन भगीरथ गायकवाड यांनी तर सरपंच यशवंत कासार यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.