लोहारा / प्रतिनिधी
सप्टेंबर अखेर मुदत संपलेल्या तालुक्यातील एकूण २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे गावपातळीवरील राजकारणाचे फड रंगू लागले आहेत.
तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीची मुदत सप्टेंबर महिना अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य नसेल तर राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेव्दारे अशा ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १५१ मधील पोटकलम १ मध्ये खंड (क) मध्ये तरतुद करण्यात आली आहे. परंतु कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार दि. २३ डिसेंबर पासून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात होणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० डिसेंबर पर्यंत आहे. प्राप्त नामनिर्देशन पत्राची छाननी दि. ३१ डिसेंबर ला होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत ४ जानेवारी २०२१ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. १८ रोजी मतमोजणी होणार आहे.
लोहारा तालुक्यात एकूण ४४ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक होण्यापूर्वी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होत होते. परंतु यावेळी निवडणूक झाल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सरपंच पद कुठल्या प्रवर्गाला जाहीर होणार हे अद्याप गुलदस्त्यात असल्याने गावपातळीवरील पुढाऱ्यांचा काहीसा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे. तरीही ग्रामपंचायत निवडणूक म्हणली की गावपातळीवर पुढारी, कार्यकर्त्यांची होणारी धावपळ यावेळीही दिसून येत आहे. आपल्याकडील सक्षम उमेदवार शोधणे, त्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव करणे यासाठी राजकीय कार्यकर्ते व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. गावपातळीवर महत्वाची समजली जाणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असायला हवे यासाठी राजकीय नेते, कार्यकर्त्याकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
या ग्रामपंचायतीची होत आहे निवडणूक
आरणी, कानेगाव, भातागळी, कास्ती बु, कास्ती खुर्द, मार्डी, लोहारा खुर्द, राजेगाव, एकोंडी (लो), मुर्षदपूर, उदतपुर, तावशीगड, चिंचोली काटे, मोघा, बेलवाडी, हराळी, कोंडजीगड, करवंजी, हिप्परगा सय्यद, फनेपुर, भोसगा, दस्तापुर, आष्टाकासार, होळी, धानुरी, करजगाव