वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात मंगळवारी व बुधवारी कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळाला. बुधवारी ( दि.१४) तालुक्यातील ६६२ नागरिकांनी लस घेतली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने लसीकरण सुरू केले आहे. सध्या तालुक्यात कोविशील्ड व कोवॅक्सीन या दोन लस उपलब्ध आहेत. सध्या तालुक्यात लोहारा, सास्तुर ग्रामीण रुग्णालय तसेच माकणी, कानेगाव, जेवळी, आष्टाकासार प्राथमिक आरोग्य केंद्र व होळी, जेवळी (दक्षिण), दस्तापुर, कास्ती(बु) उपकेंद्र या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. बुधवारी( दि.१४) तालुक्यातील एकूण ६६२ नागरिकांनी लस घेतली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तरीही काही ठिकाणी लसीबाबत गैरसमज करून घेऊन लस न घेणाऱ्याचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने लोकांमध्ये जनजागृती करून व तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने लसीकरण सुरू केले आहे. ग्रामीण भागात स्थानिक लोकप्रतिनिधी स्वतः लस घेऊन गावातील नागरिकांना लस घेण्याबाबत आवाहन करत आहेत. त्यामुळे लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले. तसेच काही ठिकाणी लसीकरण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांची सोय लोकप्रतिनिधी यांनी केली होती.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी नियम पाळणे व जास्तीत जास्त लसीकरण करणे हे दोनच उपाय आपल्याकडे आहेत. सर्व विविध प्रशासकीय विभाग, लोकप्रतिनिधी यांनी सर्व लोहारा तालुकावासियांना लसीकरण करून घेण्यास सांगावे. दुर्धर आजार असणारे नागरिक व जेष्ठ नागरिक यांना प्राधान्य द्यावे. कारण हे गट अतिजोखमीचे आहेत. आरोग्य विभाग युध्द पातळीवर काम करून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्यास सज्ज आहे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सध्या राज्य सरकारने १५ दिवस कडक निर्बंध घातले आहेत. कोरोनाची ही साखळी ब्रेक व्हावी हा उद्देश आहे. परंतु हा उद्देश साध्य करण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनीही याला प्रतिसाद देऊन अनावश्यक गर्दी करू नये. बुधवारी (दि.१४) रात्री ८ पासून या निर्बंधांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे रात्री ८ वाजल्यापासून पोलीस प्रशासनाने कारवाईस सुरुवात केल्याचे दिसून आले. परंतु गुरुवारी सकाळी पोलीस प्रशासन कुठेच दिसून आले नाही.