वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात मागील सलग सहा सात दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी मध्यम तर कधी संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिकात पाणी थांबल्यास पिके पिवळी पडून नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी तालुक्यातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे तालुक्यात ५० टक्केच पेरणी झाली होती. परंतु मागील सहा सात दिवसांपासून दररोज मध्यम, संततधार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील एक दोन दिवस असाच पाऊस राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही अशा शेतकऱ्यांना आणखी एक आठवडा तरी वाट पाहावी लागणार आहे. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी सर्वात जास्त झाली आहे. तालुक्यातील जवळपास २१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु सध्या सोयाबीनच्या कोवळ्या पानांवर गोगलगाय व अळ्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला तालुक्यातील मोजक्या दोन चार शिवारात गोगलगायीची समस्या असेल असे वाटत होते. परंतु तालुक्यातील अनेक शेतकरी या समस्येमुळे चिंतेत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सोयाबीन पिकांवर गोगलगाय व अळीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनच्या पानावर छिद्र पडल्याचे चित्र आहे. तसेच गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे कोंबच फस्त होत आहे. त्यामुळे आपल्या शेतातील गोगलगायीची समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेक उपाय करण्यात येत आहेत. हे उपाय खर्चिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मागील सहा सात दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मागील सात दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. सलग सुरू असलेल्या या पावसाने काही ठिकाणी शेतातील पिकात पाणी थांबले आहे. त्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पिकात पाणी थांबून राहत असेल तर त्या पाण्याला चर काढून वाट करून देऊन पिकातून पाणी बाहेर काढून देणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. या खरीप हंगामात लोहारा तालुक्यात आतापर्यंत जवळपास २५७०० हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे.
———-
सध्या स्थितीमध्ये सततच्या पावसाने शेतामध्ये पाणी थांबून राहत असल्यास ते पाणी मृतसरी अथवा चर काढून सुरक्षितपणे बाहेर काढून द्यावे.
मिलिंद बिडबाग,
तालुका कृषी अधिकारी
सध्या गोगलगायीमुळे हैराण झालो आहे. गोगलगायीमुळे सोयाबीन चे नुकसान होत आहे. गोगलगायी पासून पिकांचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपायांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
राम पाटील,
शेतकरी, खेड