वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तुर, करजगाव व उंडरगाव येथे घरचे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पेरणीपूर्व बियाणे प्रक्रिया कशी करावी याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
घरचे सोयाबीन हे बियाणे म्हणून वापरावे या जनजागृतीचा एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. चिमनशेट्टी यांच्या आवाहनानुसार गुरुवारी (दि.२२) लोहारा तालुक्यातील तीन प्रभागातील सास्तुर, करजगाव, उंडारगाव या गावामध्ये घरचे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेण्यात आले. पंचायत समिती लोहारा येथील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी हे प्रशिक्षण घेवून तालुक्यातील शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन हे बियाणे म्हणून वापरावे. यावर्षी सोयाबीनचे विक्रमी दर मिळत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे न विकता ते येणाऱ्या खरीप हंगामात पेरणीसाठी जतन करून ठेवावे जेणे करून पेरणीसाठी बाजारातील महागाचे बियाणे न घेता घरचे सोयाबीन बियाणे वापरता येईल व पेरणी खर्च एकरी कमीत कमी तीन हजार रुपयांची बचत होईल असे आवाहन या वेळी त्यांनी केले. तसेच यावेळी पेरणी पूर्व बियाणे प्रक्रिया कशी करावी याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे कृषि अधिकारी के. डी. निंबाळकर, डी. एल. मुळे व विस्तार अधिकारी एस. जी. पाटील यांनी सांगितले की, या पद्धतीचे प्रशिक्षण व मार्गदर्शन तालुक्यातील प्रत्येक प्रभागात करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.