वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायत इमारतीत नुतनीकरण कोनशिलावर नगरसेवकांचे नावे का टाकली नाहीत म्हणत शिवसेनेच्या नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी मुख्यधिकारी यांना घेराव घातला होता. मुख्यधिकारी यांनी नावे टाकण्यासंदर्भात लेखी दिल्याने या वादावर पडदा पडला आहे. अखेर ती कोनशीला नगरपंचायत प्रशासनाकडून शुक्रवारी (दि.५) काढण्यात आली.
लोहारा नगरपंचायतच्या इमारतीचे लाखो रुपये खर्चुन नुतनीकरण करण्यात आले आहे. या इमारतीचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनी नगराध्यक्षा ज्योती मुळे यांच्या हस्ते पार पडला होता. या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोनशिलावर उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष ज्योती मुळे व प्रमुख उपस्थिती मुख्यधिकारी गजानन शिंदे यांचेच नाव टाकण्यात आली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मुख्यधिकारी गजानन शिंदे यांच्या दालनात जाऊन यासंदर्भात जाब विचारला. शिंदे यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर सर्वाचे नावे टाकून नविन कोनशिला दि. २ फेब्रुवारी रोजी बसविली जाईल असे शिंदे यांनी सांगितले होते. शिवसेनेचे गटनेते अभिमान खराडे यांनी तसे लेखी देण्याची मागणी केली. त्या कोणशिलेवर सर्व नगरसेवकांची नावे लावण्यासंदर्भात गटनेते खराडे यांनी पत्राव्दारे मागणी केल्यानंतर मुख्यधिकारी शिंदे यांनी दि. २ फेब्रवारी पर्यत कोनशिलेवर नावे लावण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र दिले होते. अखेर नगरपंचायत प्रशासनाकडून शुक्रवारी (दि.५) ती कोनशीला काढण्यात आली. आता सर्व नगरसेवकांची नावे नवीन कोनशीलेवर टाकून ती कधी बसवली जाणार हे पाहावे लागेल.