वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी विनंती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयुक्त, राज्य निवडणूक आयोग मुंबई यांना गुरुवारी (दि. १६) पत्र पाठवले आहे.
या पत्रात आमदार चौगुले यांनी म्हणले आहे की, माझ्या मतदारसंघातील लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपत आल्याने राज्य निवडणूक आयोगाने उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना लोहारा (बु) नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी कार्यक्रम २०२०- २१ घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार १९ एप्रिल रोजी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करावी व दि. १९ ते २९ एप्रिल पर्यंत सदर यादीवर हरकती व सूचना मागवायच्या आहेत. परंतु राज्यात कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ एप्रिल ते १ मे पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. यादरम्यान कलम १४४ लागू असून नागरिकांना बाहेर फिरण्यास संचारबंदी केलेली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यास यादी पाहणे, यादीवर सूचना, हरकती नोंदवणे यासाठी नगरपंचायत कार्यालयात गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सध्या लोहारा शहरासह परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच असल्याने सदर प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास स्थगिती देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोहारा (बु) नगरपंचायतच्या प्रारूप मतदार यादी कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देऊन सहकार्य करावे अशी विनंती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या पत्राद्वारे केली आहे.