वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शुक्रवारी ( दि. २३) लोहारा तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती घेऊन काही सूचना केल्या. लोहारा शहरातील कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट देऊन तेथील पाहणी केली तसेच रुग्णांची विचारपूस केली.
लोहारा तहसील कार्यालयामध्ये खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व आ. ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिप सदस्य दीपक जवळगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोहन पणुरे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसिलदार संतोष रुईकर, नायब तहसीलदार रणजित शिराळकर, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, गटविकास अधिकारी ए. के. अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गजानन शिंदे आदी उपस्थित होते.
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार चौगुले यांनी तालुक्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या वाढत असलेला कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करण्यासह लोहारा ग्रामीण रुग्णालय येथील ऑक्सिजन बेड कोरोना रुग्णासाठी राखीव करुन कोरोना रुग्णांची अडचण करावी. गरज भासल्यास कोविड केअर सेंटरसाठी नियोजन करण्यासाठी युवासेना शिवसेनेतर्फे स्वयंसेवक देण्यात येतील असे सांगितले. तसेच रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, कोविड सेंटरमधील रुग्णांना सुविधा मिळतात का याची तपासणी करावी अशा सूचना त्यांनी केल्या. येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी असलेले व पावसात न भिजलेले सोयाबीनचे बियाणे उगवणशक्ती तपासूनच पेरणीसाठी वापरावे असे आवाहन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, नागरिकांनी घाबरून न जात प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन खासदार राजेनिंबाळकर यांनी केले.
यावेळी आ. ज्ञानराज चौगुले म्हणाले की, बियाणामध्ये बचत करणे व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करून पेरणीसाठी रुंद सरी, वरंबा (बीबीएफ) पद्धतीने पेरणी करावी असे आवाहन त्यांनी केले. तर तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी आजपर्यंत तालुक्यातील १८ गावांमध्ये बियाणे उगवणशक्तीची प्रात्यक्षिके कोरोना नियमांचे पालन करुन करण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अभिमान खराडे, शाम नारायणकर आदीसह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवून उपस्थित होते.