वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती लोहारा अंतर्गत आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त लोहारा तालुक्यात भरडधान्य बाबतीत जाणीवजागृती करण्यासाठी व त्यांचा रोजच्या आहारात जास्तीत जास्त समावेश व्हावा या दृष्टीने कार्यशाळा, महिला मेळावे व पाककला कृती स्पर्धाचे आयोजन पंचायत समिती लोहारा यांच्या वतीने दि. २९ मार्च ला पंचायत समिती लोहारा येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जाणीवजागृती मेळावा, पाककला कृती स्पर्धा व स्वयंसहायता गटांच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर विषयावर जाणीव जागृती करण्याच्या अनुषंगाने यावेळी माहिती देण्यात आली. तसेच भरडधान्यापासून बनविण्यात आलेल्या उत्कृष्ट पाककृतीचे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे यांनी केले. भरडधान्याचे आहारात महत्व या विषयी माहिती दिली. आहारामध्ये ज्वारी बाजरी नाचणी राळा वरई इत्यादी भरडधान्य विषयी माहिती देण्यात आली. तसेच जेवळी येथील अंगणवाडी कार्यकर्ती जयश्री जाधव यांनीही भरड धान्य विषयी माहिती दिली.
सदर कार्यशाळेत पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश गायकवाड यांनीही बदलती जीवनशैली आहारामध्ये फास्टफूडचा वापर व त्यामुळे होत असलेले आजार जसे रक्तदाब, हृदयविकार हे आजार टाळायचे असतील तर आहारात भरडधान्य याचा वापर केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी अमोल कासार, प्रणिता कटकदौड, राहुल मोहरे, अन्तेश्वर माळी, प्रीतम बनसोडे, किशोर हुडेकर, सचिन गायकवाड, नंदन थोरात, प्रदीप लोंढे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदीप चव्हाण यांनी तर सौरभ जगताप यांनी आभार मानले. या कार्यक्रमा करिता लोहारा तालुक्यातील प्रभागसंघ व ग्रामसंघ पदाधिकारी, सीआरपी, कृषी सखी, पशुसखी, उदयोग सखी उपस्थित होते.
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जगभर साजरे केले जात आहे. अशा या भरडधान्यांची पौष्टिकता आणि त्यांचे हजारो वर्षांचे पारंपरिक महत्त्व केंद्र शासनाच्या लक्षात आले. आणि आपल्या देशाने इतर देशांच्या मदतीने भरडधान्यांना संरक्षण मिळावे, त्यांचे लागवडीचे क्षेत्र वाढून लोकांच्या आहारात त्यांचा समावेश व्हावा, त्याचे महत्व सर्व राष्ट्रांना समजावे म्हणून आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष हा ठराव युनोमध्ये मांडला. ७० देशांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महत्त्वाचे म्हणजे सर्व १९३ सदस्य राष्ट्रांनी भारताच्या या प्रयत्नांचे कौतुक करत हा ठराव बहुमताने मंजूर केला. आपल्या देशाच्या या प्रयत्नामुळेच ३ मार्च २०२१ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरले आणि सर्व सदस्य राष्ट्रांनी त्या दिशेने प्रयत्न करण्यास सुरुवात केली.