वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
एक हार्डवेअर दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चार हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना लोहारा शहरात घडली आहे. तसेच या अज्ञात चोरट्यांनी शहरातील सोन्या-चांदीचे दोन दुकान फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे मंगळवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आला.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, शहरातील एसबीआय बँकेच्या बाजूला बालाजी बिराजदार यांचे मातोश्री हार्डवेअरचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बालाजी बिराजदार दुकान बंद करून घरी गेले. या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकाटून आता प्रवेश केला. गल्ल्यातील रोख चार हजार रुपये लंपास केले. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दुकान उघडण्यास आल्यानंतर दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क करुन माहीती दिली. पोलिस हवालदार एच.एम. पापुलवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला. दुकानात एक चोरटा तोंडाला रुमाल बांधून गल्ल्यातील पैसे घेत असल्याचे सीसीटीव्ही कमेऱ्यात दिसले.
तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री जयलक्ष्मी माऊली ज्वेलर्सच्या गेटचे कुलून तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. पण कुलूप न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कानेगाव रस्त्यावरील असलेले बालाजी ज्वेलर्स या दुकानातही असाच प्रकार घडला. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटे चारचाकी वाहन घेऊन आले. त्यांनी कुलूपाची पाहणी करून वाहनातून पसार झाल्याचे सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाल्याचे समजते. या प्रकरणी लोहारा शहरातील सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने पोलिस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांना निवेदन देऊन रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या वतीने रात्री गस्त वाढविणे आवश्यक आहे.