वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढतच आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महसूल, पोलीस व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.११) लोहारा शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ६६ जणांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. विशेष म्हणजे यातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी जिल्ह्यात दि 8 ते 13 या दरम्यान जनता कर्फ्यु जाहीर केला आहे. तरीही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मंगळवारी ( दि.११) सकाळी शहरातील जगदंबा मंदिराजवळ अचानकपणे थांबून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या 66 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे यातील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्वांवर दंडात्मक कारवाई करून शासनाने दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे अशी सूचना देण्यात आली. महसूल, आरोग्य व पोलीस विभागाच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली. यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना चाप बसेल. यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे, जिल्हा समूह संघटक सतीश गिरी, पोलीस कर्मचारी हणमंत पापुलवार यांच्यासह तिन्ही विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.