मुरूम प्रतिनिधी:
उमरगा तालुक्यातील मुरूमच्या पंचक्रोशीत भरली जाणारी यात्रा म्हणजेच माळवरील विठोबाची जत्रा होय. बुधवारी (दि.२३) मुरूमच्या माळावरील श्री विठ्ठल-रुकमाई मंदिरात भक्तिमय वातावरणात भाविकांनी गर्दी करून शांततेच्या वातावरणात विठ्ठलाचे दर्शन घेतले. प्रारंभी श्री विठ्ठल मंदिरात पहाटे ४ वाजता काकड आरती संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी आपल्या मित्रपरिवारासह दर्शन घेतले.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली होती. कोरोनाच्या कालखंडानंतर यात्रा हळूहळू पूर्वरत होताना दिसत आहे. या यात्रेकरिता परिसरातील विविध गावातील नागरिकांनी हजेरी लावली. गेल्या अनेक वर्षाची परंपरा असल्याचे यावेळी मंदिराचे पुजारी महादेव महाराज यांनी सांगितले. सुंदरवाडी येथून श्री दुधागिरी महाराज यांची पालखीसह काटी मुरूम शहरातून रमेश लामजाने यांच्याकडून काला आणला जातो. एक ते दीडच्या सुमारास पालखी, काटीचे मंदिरात आगमन होते. त्यानंतर काला फोडल्यानंतर यात्रा फुटते अर्थात यात्रेस सुरवात होते अशी माहिती पुजाऱ्यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर बंदी होती. त्यानंतरची भरलेली विठोबाची ही पहिलीच यात्रा असल्याने भाविकांची तुफान गर्दी झाली होती. विविध खाद्यपदार्थ, फळ-फळावळ, चिमुकल्यासाठी खेळण्या, कपडे, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची दुकाने यात्रेनिमित्ताने थाटली होती. नागरिकांनी रांगेत दर्शन घेऊन मंदिर परिसरातील थाटलेल्या दुकानाचा आनंद घेतला. पूर्वी मुरूमच्या पंचक्रोशीतील यात्रेसाठी बैलगाड्या जुंपल्या जायच्या. कालांतराने बैलगाड्याची जागा आता मोटार गाडीने घेतली असल्याचे दिसून आले. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरूम पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. रंगनाथ जगताप, पवन इंगळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ. सत्यजित डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान परिसरात यात्रेत येणाऱ्या भाविकांना आयईसी देऊन आयसीटीसी विभागामार्फत त्यांना एच.आय.व्ही.(एड्स) तसेच एनसीडी विभागामार्फत बीपी-शुगर, तंबाखू नियंत्रण विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी आरबीएसकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंडाजी कांबळे, समुपदेशक संतोष थोरात, सुजित जाधव, मलेरिया विभागाचे सुरेश भालेकर, गजानन डावरे, लखन भोसले आदी उपस्थित होते. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी यात्रेत सहभाग घेऊन सहकार्य केले. यावेळी यात्रा स्थळी अग्निशमन यंत्रना सज्ज करण्यात आली होती.