वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विमा कंपनीकडून खोटं रेकॉर्ड तयार करून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या विमा कंपन्या सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरतात आणि शेतकऱ्यांना लुबाडतात. सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकतात हे आता सिद्ध झाले आहे. आणि आता हे सगळे पुरावे घेऊन मी कोर्टात जाणार आहे. आणि ही बजाज कंपनी कशी वाचते ते मी आता बघणारच आहे अशा तीव्र शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी विमा कंपनीविरुद्ध जोरदार हल्ला चढवला.लोहारा तालुक्यातील माकणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. १२) सायंकाळी ७ वाजता भव्य ऊस व सोयाबीन परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजू शेट्टी बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम दळवे हे होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, युवती आघाडी अध्यक्षा पूजा मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, अशोक मुटकुळे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हाक्के, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, ऊसाच्या बिलातून वीज बिल वसुलीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, ऊसाची एक रकमी एफ आर पी मिळावी, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये जाहीर केलेली मदत तात्काळ द्या, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार देण्यात यावे, शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करावा आदी मागण्यांसाठी या ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, विम्याबाबत संपूर्ण मराठवाड्यात अशीच परिस्थिती आहे. मराठवाड्यात एकही असा जिल्हा नाही की जिथे शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून न्याय मिळाला आहे. विमा कंपन्यांनी हजारो कोटींचा जो काही दरोडा घातलेला आहे त्याला हे सरकारी अधिकारी आणि राज्य आणि केंद्र सरकारमधील उच्च पदस्थ नेते सामील आहेत म्हणून हा दरोडा वाढला आहे असा घणाघात त्यांनी यावेळी बोलताना केला. हा पैसा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी साखर कारखानादारांचाही समाचार घेतला. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाला दोन हजार आठशे ते ३१०० पर्यंत एफआरपी दिली जाते परंतु तुमच्या शेजारील लोकमंगल कारखाना दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपयांनी ऊसाची बिले काढतो अशी माहिती मला शेतकऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे ऊस बिल सात ते आठ महिन्यांनी दिले जातात असेही सांगण्यात आले. परंतु कायद्याने बघितले तर ऊस तोडणी झाल्यापासून चौदा दिवसाच्या आत उसाचे बिल कारखान्याने अदा केले पाहिजे. तुमच्या भागात तसे होताना दिसून येत नाही. तुमचे प्रश्न सोडवायला कृष्ण रामाचा अवतार घेऊन कुणी येणार नाही. त्यामुळे तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हालाच एकत्र येऊन या कारखान्याला जाब विचारला पाहिजे. तसेच असे करताना जर कारखान्याकडून तुम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर मला आवाज द्या, तुमच्यासाठी मी कुठंही यायला तयार आहे असा विश्वास देत रडत बसू नका, लढायला शिका असे आवाहन राजू शेट्टी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. ऊस परिषदेच्या सुरुवातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा माकणी ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच विठ्ठल साठे, उपसरपंच वामन भोरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, शेतकरी उपस्थित होते. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे, युवती आघाडी अध्यक्षा पूजा मोरे आदींनीही मनोगत व्यक्त केले.या ऊस परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील गरड, उमरगा तालुकाध्यक्ष रामेश्वर कारभारी, माजी सरपंच शरद जाधव, पंडित ढोणे, बालाजी साठे, ओंकार साठे, उपसरपंच वामन भोरे, अच्युत चिकुंद्रे, सरदार मुजावर, बाजीराव पाटील, केशव पाटील, बापू थिटे, गोवर्धन आलमले, दादासाहेब मुळे, फुलचंद आळंगे, काकासाहेब पाटील, दत्ता पाटील आदींसह लोहारा उमरगा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन शिवाजी साठे व बालाजी साठे यांनी केले.