वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा मागील दोन महिन्यापासून खंडित झाला आहे. वीजवितरण कंपनीकडे शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी (दि.२७) सकाळी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला.
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) गावातील बहुसंख्य लोक शेती व्यवसाय करतात. कृषिपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीने स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून ६८ रोहित्र बसवले आहेत. परंतु या फिडरवरूनच इतर तीन गावांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे फिडरवर अतिरिक्त भार पडत असल्याने सतत रोहित्र नादुरूस्त होणे, तांत्रिक बिघाड होणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे काही वर्षापासून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच मागील दोन महिन्यापासून परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत वीजवितरण कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु तक्रारीची दखल घेतली नसल्याने हिप्परगा येथील संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बुधवारी सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच विजय लोमटे, धर्मवीर जाधव, विजय नरगाळे, नारायण क्षीरसागर, जीवन होनाळकर, विनोद मोरे, संजय नरगाळे, अनिल आतनुरे, उमेश गिराम, मनोज गवळी, तानाजी नरगाळे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह सुमारे दीडशे शेतकरी उपस्थित होते.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी वीजवितरण कार्यालयास टाळे ठोकून सुमारे तीन तास आंदोलन केले. टाळे उघडणारच नाही, असा आक्रमक पवित्रा शेकऱ्यांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण केल्यानंतर हा तणाव निवळला. वीजवितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता आर. एस. दीक्षीत यांनी सलग आठ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.