वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अनेक मागण्यांसाठी आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आग्रहानंतर सातव्या दिवशी आपण हे उपोषण स्थगित करत असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले आहे.
यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की, 2020 व 2021 च्या खरीप हंगामातील प्रलंबित पीकविमा, यावर्षी अतिवृष्टी, सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी आपण बेमुदत उपोषण सुरू केले होते. काल आंदोलनाच्या सहाव्या दिवशी प्रकृती थोडी ढासळली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब हे नियमित फोनवरून विचारपूस करीत होते. सरकारकडे भांडून आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ, उपोषण तूर्त मागे घेण्यासाठी त्यांचाही आग्रह होताच. मध्यंतरी उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी उपस्थित राहून आपल्या लढ्यात बळ भरले. हजारो शेतकरी, शेकडो ग्रामपंचायती, विविध पक्ष, संघटना, सोसायट्या, समाजातील प्रतिष्ठित, सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या संघर्षाला साथ दिली.
आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांनीही भेट देऊन शेतकऱ्यांचा आपला लढा अधिक समृद्ध केला. कालपासून आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासन व प्रशासन दोन्ही स्तरावरून वेगाने हालचाली करत होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फोनवरून संवाद साधत शेतजऱ्याना तातडीने मदत देऊन, विम्यासाठी बैठक लावणार असल्याचे आश्वसित केले होते. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकाळी आपल्याशी फोनवरून चर्चा केली. नुकसानीची शासकीय मदत त्वरित देण्याचा शब्द त्यांनी दिला. विमा भरपाई वसुलीसाठी कंपनीचे बँक खाते गोठवणे, प्रॉपर्टी जप्त करणे अशा स्वरूपाची कार्यवाही सुरू केली जाईल, असाही शब्द दिला. हा आपल्या लढ्याचा मोठा विजय मी मानतो.
शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव साहेबांच्या आदेशाचा सन्मान राखून व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून आपला लढा तूर्त थांबवित आहे. मात्र जर यानंतरही येत्या काही दिवसात शब्द पाळला गेला नाही तर आपला शेतकरी हक्काचा लढा यापेक्षा तीव्र करणार आहे. आपण सर्वांनी माझ्यावर दर्शविलेले प्रेम, विश्वास याला कधीही तडा जाऊ देणार नाही असे अभिवचन आ. कैलास पाटील यांनी यावेळी दिले.