वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. संचारबंदी लागू असूनही अनेकजण कारणे सांगून अनावश्यक बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शुक्रवारी (दि. १६) एक नवा आदेश काढला असून ज्यात संचारबंदीत सूट दिलेली दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी दोन यावेळेतच सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.
या आदेशात जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी म्हणले आहे की, यापूर्वीच्या आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली असूनही नागरिक अत्यावश्यक सेवेबरोबरच सूट देण्यात आलेल्या बाबींचे कारण सांगून मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून संचारबंदी चे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असून कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तात्काळ अधिकच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व आणखी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. त्याप्रमाणे पुढील अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ सुरू राहतील ज्यात दवाखाने, रोगनिदान केंद्र, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये औषधी दुकाने यासह वैद्यकीय व आरोग्य सेवा , सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूक, पाणीपुरवठा सेवा, नगरपंचायत, नगरपरिषद हद्दीच्या 10 किमी अंतराच्या पुढील व राज्य, राष्ट्रीय मार्गावरील पेट्रोलपंप पूर्ण वेळ सुरू राहतील. इतर पेट्रोलपंप 7 ते दुपारी 2 यावेळेतच सुरू राहतील. एटीएम, विद्युत व गॅस पुरवठा पूर्ण वेळ सुरू राहील.
यापूर्वी च्या संचारबंदीच्या आदेशात सूट देण्यात आलेले किराणा दुकान, भाजीपाला विक्री, दूध विक्री, बेकरी, कृषी विषयक साहित्य आदींची दुकाने केवळ दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी, या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस, नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्यावर राहणार आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील असेही यात नमूद करण्यात आले आहे.