वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पोरीच्या लग्नाची फिकीर करतोया, लग्नासाठी शेती विकतोया, बाप माझा रानात राबतोया.
कवी -श्री प्रभाकर फपाळ सर.
सोनपेठ येथील कवींचा सोनकवी या ग्रुपचे पहिले ऑनलाइन कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मारोती कच्छवे सर, उद्घाटक ॲड. मनीषा आंधळे मॅडम तर प्रमुख पाहुणे कल्याणराव फपाळ सर हे होते. या कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. गोविंद लहाने सर यांनी केले.
या ऑनलाईन कवि संमेलनात प्रा. सुनिता टेंगसे मॅडम यांनी
मनातील विचारांना प्रत्यक्षात आणते ती लेखणी
दुसऱ्याच्या मनातील भाव जाणते ती लेखणी
पर वेदनांना जाणुनी रेखाटते ती लेखणी.
या लेखणी कवितेतून त्यांनी वास्तव चित्रण रेखाटले .
तर सौ. स्वरूपा कदम यांनी नारीशक्ती या कवितेतून
शिकली सावरली तरी
संस्कार ना विसरली
वेल होऊन मायेची
अंगणी ती पसरली .
या कवितेतून आजच्या नारीशक्ती विषयी भाव व्यक्त केली.
तर डॉ. अनुराधा जाधव यांनी पावसाळा जवळ आलाय, तर स्वप्नील राठोड यांनी कोरोना ही रचना सादर केली.
प्रभाकर फपाळ यांनी
कुणब्याच्या पोरा
आता राहू नको कोरा
तुझं शिकायचं वय
हे भान ठेव जरा
अशा ओळी सादर करून शेतकरी मुलाच्या शिक्षणाबद्दलचे वास्तव दर्शन कुणब्याच्या पोरा या कवितेतून रेखाटले.
तर सौ. आयोध्या घोडके यांनी
आस मराठी
ध्यास मराठी
साहित्याचा ती
श्वास मराठी
या ओळी सादर करून माय मराठी विषयी भावना सादर केली.
तर कल्याणराव फपाळ यांनी शेतकर-याचे हाल व कोरोना काय तुझ्या मनात या रचना सादर केल्या.
तर प्रा.डाॅ. मारोती कच्छवे यांनी कोरोना या कवितेतून
देशात आलिया आलिया कोरूना ची लाट
कोरोना कोरोना सोडना पाट
सर्दी पडशान माणस परेशान झाली
दवाखान्यात जागा अपुरी पडली
देशात आलया आलया संकट मोठ
रानी पिकविला भाजीपाला देशात लॉक डाऊन सुरू झाला
यायची जायची बंद केली वाट
अशा ओळी सादर करून सध्या परिस्थितीच्या महामारी परिस्थितीचे वास्तव दर्शन रेखाटले आहे.
तर अॅड मनीषा आंधळे यांनी कोरोना जाईलं व शेणाची झाली फुले ही रचना सादर केल्या.
तर प्रा. गोविंद लहाने यांनी बाप व लेक माझा अभिमान या रचना सादर केल्या . माझी लेक माझा अभिमान या कवितेतून
माझी लेक माझा अभिमान
तिने फुलवले माझे अंगण
माझ्या लेकीचा मला नाही वाटत भार
माझ्या आनंदाचा खरा तो आधार
या ओळी सादर करून लेक वाचली पाहिजे , ती जन्माला आली पाहिजे , तिचा सन्मान केला पाहिजे , तिला शिकवलं पाहिजे , याविषयी भावना व्यक्त केली.
सोनकवी ग्रुपचे हे पहिले ऑनलाइन कवी संमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सोनपेठ येथील सोनकवी हा कवींचा ग्रुप नवोदित साहित्यिकांसाठी एक सुंदर व्यासपीठ असून साहित्यनिर्मितीसाठी प्रेरणादायी आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!