वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तेरणा कारखाना प्रॉव्हीडेंट फंड कार्यालयाने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे पीएफ थकित रकमेसाठी कारखाना जप्त करून लिलावाला काढला होता. त्यास उच्च न्यायालयात स्थगिती घेऊन गेल्या पाच वर्षापासून डीआरटी, डीआरएटी, उच्च न्यायालय या सर्व न्यायालयीन प्रक्रियेचा लढा अव्याहत देऊन सर्व अडथळे पार करत जिल्हा बँक सक्षम करण्यासाठी यश मिळाले आहे . हजारो लोकांच्या ठेवी या बँकेत आहेत त्यांना व भविष्यात शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेती कर्ज मिळवण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे. हा जिल्हा बँकेचा पुनर्जन्म असून आगामी काळात शेतकऱ्यांना मदत करणार असे मत जिल्हा बॅंकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
जिल्ह्यातील तेरणा व तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिल्याने आगामी काळात उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव मिळण्यास मदत होणार आहे. कारखाने भाडेतत्वावर देऊन जिल्हा बँकेला पुन्हा एकदा ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी मागील चार ते पाच वर्षापासून अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्या बद्दल उमरगा लोहारा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन, गटसचिव , व कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या व जिल्ह्याच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा असणारा तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखाना सुरु होणे आवश्यक होते. त्यामुळे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. बिराजदार व संचालक मंडळाने मागील चार वर्षापूर्वी पाठपुरावा सुरू केला होता. यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व प्रशासनातील विविध अधिकाऱ्यांची भेट घेवुन प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असुन तेरणा व तुळजाभवाणी साखर कारखाने दीर्घ मुदतीच्या भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. त्यामुळे डबघाईला आलेल्या जिल्हा बँकेत गतवैभव प्राप्त होणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी शेतमजुरांना याचा मोठा फायदा होणार आहे.
जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा. बिराजदार यांनी केलेल्या या अथक प्रयत्नाना यश आल्याबद्दल उमरगा तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व गट सचिवांनी चेअरमन प्रा. बिराजदार व व्हा.चेअरमन कैलास शिंदे यांचा सोमवारी दि .२९ रोजी उमरगा येथे सत्कार केला . यावेळी राम जाधव ,सुनील साळुंके ,प्रताप महाराज, नेताजी कवठे, भीमा स्वामी, बालाजी साळुंके, सुभाष गायकवाड, शमशोद्दीन जमादार ,प्रदीप गावकरे ,सचिन केशवशेट्टी, विजय पाटील, लिंबराज पाटील, प्रदीप पाटील, बाळासाहेब बुंदगे, बाळासाहेब बिराजदार, सचिन रणखांब, विजय सगर, विजय जगताप, ओम गायकवाड, शिवाजी उपासे, काशिनाथ गायकवाड, दत्ता वाडीकर ,सतीश जाधव, देविदास शिंदे ,विठ्ठल औरादे, शिवाजी पाटील, संजय चव्हाण, आदींची प्रमुख उपस्थिती होती.