वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती उमरगा येथे गोठ्याचे शेड बांधकाम अनुदान मिळणे कामी दाखल केलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी 2000/-रुपये लाचेची मागणी करून लागलीच 2000/- रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारल्या प्रकरणी उमरगा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक बुद्धार्थ ग्यानु झाकडे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती उमरगा येथे गोठ्याचे सेड बांधकाम अनुदान मिळणे कामी दाखल केलेल्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक बुद्धार्थ ग्यानु झाकडे यांनी तक्रारदाराकडे 2000/-रुपये लाचेची मागणी करून लागलीच 2000/- रुपये लाच रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) दुपारी २ च्या सुमारास ही कारवाई दिलखूष टी हाऊस, पंचायत समिती उमरगा येथे करण्यात आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस ठाणे उमरगा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागा उस्मानाबादचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक विकास राठोड यांच्यासह पथकात पोलीस अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, सचिन शेवाळे यांचा समावेश होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. कार्यालय 02472 222879
टोल फ्री क्रमांक.1064