लोहारा शहरातील बाजार रस्त्यावर पावसाळ्यात नेहमी चिखल होत असल्याने बाजारसाठी येणाऱ्या महिला नागरिकांसह या रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या जवळपास आठशे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. चिखल व पाणी साचलेल्या रस्तातून वाट काढत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. या समस्येवर प्रशासन काहीच मार्ग काढत नसल्याने आक्रमक झालेल्या माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवकाने याच ठिकाणी असलेल्या चिखलात बसून शुक्रवारी (दि.१९) आंदोलन केले.
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाणी जाण्यासाठी दोन्ही बाजूला नाल्या नसल्याने याठिकाणी पाणी थांबून चिखल होतो. जिल्हा परिषद शाळेत जवळपास आठशे विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना या चिखलमय व पाण्याच्या रस्त्यामधून वाट काढत शाळा गाठताना मोठी कसरत करावी लागली. लहान मुलांना शाळेत जाताना होणारा हा त्रास पाहून अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पावसाळ्यात ही परिस्थिती नेहमीचीच आहे. याठिकाणी फक्त मातीमिश्रित मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करून विद्यार्थ्यांना नेहमी होणाऱ्या या त्रासापासून सुटका करावी अशी अपेक्षा अनेक पालकांनी व्यक्त केली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध, महिला, नागरिकांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. बाजारदिवशी तर पाऊस झाला की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होतो. त्यामुळे विक्रेते, बाजारकरूंचे हाल होतात. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याठिकाणी उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु तसे होताना दिसत नाही.
शालेय विद्यार्थी व नागरिकांना नेहमी होणारा हा त्रास पाहून माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आयुब शेख यांनी लोहारा नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले होते. विद्यार्थी, नागरिक व्यापारी यांना चिखलमय रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा तक्रारी मांडल्या परंतू नगरपंचायतीने काहीही उपाय योजना केली नसल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. नगरपंचायतीने सर्वसाधारण सभेमध्ये मुरूम टाकणे, रस्ता तयार करणेबाबत ठरावही घेतले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे निवेदनात म्हटले होते. तसेच दि. १८ सप्टेंबर पर्यंत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थी, पालक व नागरिक तसेच लोकप्रतिनिधीसह आंदोलन करणार असल्याचा ईशारा निवेदनात दिला होता.

त्यानुसार शुक्रवारी (दि.१९) दुपारी साडे बाराच्या सुमारास या रस्त्यावर चिखल व पावसाचे पाणी साचलेल्या जागेत बसून माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक आयुब शेख व प्रशांत काळे यांनी आंदोलन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरी लोखंडे, दयानंद फरीदाबादकर यांच्यासह विद्यार्थी, पालक, बाजारासाठी आलेले व्यापारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या चिखलमय रस्त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. जवळपास अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी नगरपंचायतचे कार्यालय अधीक्षक प्रदीप मोटे यांनी आंदोलनस्थळी येऊन नगरपंचायतच्या वतीने लेखी पत्र दिले. मुरूम टाकण्याबाबतची निविदा काढण्यात आली असून कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण होताच या रस्त्यावर मुरूम टाकून दबई करण्यात येणार आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आले. ————–
या रस्त्यावर असलेल्या चिखलात बसून मी आंदोलन केल्यावर नगरपंचायत कडून मला पत्र देण्यात आले आहे. रस्त्यावर मुरूम टाकून दबई करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु पुढील आठ दिवसांत हे काम झाले नाही तर मी बाजार दिवशीच आत्मदहन करणार आहे.
आयुब शेख,
आंदोलनकर्ते, माजी उपनगराध्यक्ष






