लोहारा तालुक्यात हॅलो मेडिकल फाउंडेशन च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “निर्धार समानतेचा प्रकल्प” अंतर्गत “हिंसामुक्त समाजासाठी पहाट समानतेची” या जनजागृती मोहिमेअंतर्गत तालुक्यातील फणेपूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बालविवाह निर्मूलन, स्त्रियावरील हिंसा प्रतिबंध आणि स्त्री-पुरुष समानतेच्या मूल्यांची जाणीव रुजविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभा गवंडी होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य भैरवनाथ कानडे उपस्थित होते. उपसरपंच दत्ता काळे, पोलिस पाटील राजकुमार माळी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मुबारक चांदसाहेब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी अहंकारी आणि विश्वस्त डॉ. क्रांती रायमाने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. “बालविवाह हद्दपार करा”, “समानता हीच गावाची महानता”, “हिंसा थांबवा , संवाद वाढवा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फणेपूर ग्रामस्थांनी काढलेल्या जागरूकता रॅलीने समानता आणि हिंसामुक्त जीवनाचा संदेश देण्यात आला. प्रमुख वक्ते भैरवनाथ कानडे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “बालविवाह ही परंपरा नसून अन्यायाची साखळी आहे. एका चुकीच्या निर्णयाचे ओझे संपूर्ण आयुष्यभर मुलीला वाहावे लागते. हिंसा कधीच समस्या सोडवत नाही; समानता, सन्मान आणि संवाद हीच कुटुंबाची खरी ताकद आहे. हिंसामुक्त गाव निर्माण करायचे असेल, तर प्रत्येक कुटुंबाने बदलाची पहाट स्वतःपासूनच उगवावी लागते.” समाज सुधारक व संत महंतांची परंपरा आपणाला समानतेचा संदेश देत असल्याचे सांगत त्यांनी महिलांचे शिक्षण, स्वावलंबन आणि युवकांमध्ये सकारात्मक मूल्यांची गरज यावर भर दिला.
या कार्यक्रमात युवा क्रांती कला मंचच्या कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले. बालविवाह, व्यसनमुक्ती आणि स्त्री सक्षमीकरणावर आधारित संदेशांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. या उपक्रमाच्या यशासाठी प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, सहायक समन्वयक सतीश कदम, स्वाती पाटील, समुपदेशिका वासंती मुळे, पर्यवेक्षक इंदुबाई कबाडे, ज्ञानेश्वर जाधव, सुनिता गोरे, प्रणिता भोसले, सोपान सुरवसे, पल्लवी साळुंके, बालाजी चव्हाण, दिनकर गाढवे, नूतन गायकवाड यांच्यासह ३० गावांतील प्रेरक-प्रेरिका, लक्षगट व आधारगट सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कदम यांनी केले. सूत्रसंचालन सोपान जाधव यांनी केले.









