लोहारा तालुक्यातील माकणी येथे ग्रामपंचायत कार्यालय माकणी व मोरे कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सरपंच सौ. स्वातीताई विठ्ठल साठे यांच्या संकल्पनेतून शनिवारी (दि.२९ नोव्हेंबर) राज्यस्तरीय जवाहर नवोदय विद्यालय सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. या परीक्षेचे यावर्षीचे हे तिसरे वर्ष आहे.
दि. १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना उत्तम सरावाची संधी मिळावी, तसेच परीक्षेची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढावा, या हेतूने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेची सर्व तयारी आयोजकांकडून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी या सराव परीक्षेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर होती. अंतिम दिवसापर्यंत तब्बल ११२८ विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे, ही बाब विशेष उत्साहवर्धक ठरली आहे.
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था भारत विद्यालय माकणी २५ हॉल, सरस्वती विद्यालय माकणी मध्ये १० हॉल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जि प्र कन्या शाळा माकणी मध्ये १२ हॉल या तीन केंद्रांवर करण्यात आली आहे. एका हॉलमध्ये २४ विद्यार्थ्यांची व्यवस्था असून एकूण ४७ हॉलमध्ये परीक्षा होणार आहे. बाहेरील गावांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी सचिन ज्वेलर्स, माकणी तर्फे मोफत जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा संपल्यानंतर त्याच दिवशी ४ वाजता निकाल जाहीर करण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे आणि चषक प्रदान करण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम पुढीलप्रमाणे :
• प्रथम क्रमांक : ₹५,५०० + चषक
• द्वितीय क्रमांक : ₹४,५०० + चषक
• तृतीय क्रमांक : ₹३,५०० + चषक
• चौथा क्रमांक : ₹२,५०० + चषक
• पाचवा क्रमांक : ₹१,५०० + चषक
• ६ ते १५ क्रमांक : प्रत्येकी ₹१,००० + चषक
जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा आयोजकांचा मानस असून परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व स्तरावरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असे आयोजकांकडून सांगण्यात आले.













