विशेष सखोल संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत सहाय्यक बीएलओचे खातेबाह्य कामे अंगणवाडी सेविकांना सक्तीने लावत असल्याच्या विरोधात लोहारा तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. १३) अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी धरणे आंदोलन करत तिव्र निदर्शने केली. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य संघटक दत्ता देशमुख, शहरी तालुकाध्यक्ष वंदना भगत, ग्रामीण तालुकाध्यक्ष सुनीता कदम, बेबी जावळे, गीता मातोळे, दैवशाला नरगाळे आदींसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार रतन काजळे यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनात म्हणले आहे की, केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत महाराष्ट्रात ग्रामिण भागात अंगणवाडी सेविका /मदतनिस या मानधनी सेवेत कार्यरत आहेत. त्यांना ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार पुरवणे, आरोग्य तपासणी व लसीकरण तसेच बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवादवारे पार पाडावे लागतात. सदर अंगणवाडी कर्मचारी राज्यातील बालकांच्या कुपोषण निर्मुलन या महत्वपुर्ण कामकाजासाठी आपल्या सेवा देत आहेत. त्याचप्रमाणे योजनेशी संबंधीत केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध योजनांची क्षेत्रीय स्तरावर कार्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या अंगणवाडी कर्मचाऱ्यावर आहे.

अंगणवाडी सेविकांना इतर खातेबाह्य कामे दिल्यास मुळ कामात खंड पडुन त्याचा लाभार्थ्यावर विपरीत परीणाम होवु शकतो. अशा विपरीत परीणामामुळे झालेल्या हानीची जबाबदारी खातेबाहय कामे सांगणाऱ्या अधिकाऱ्यावर येवु शकते. या अनुषंगाने भारत सरकारच्या आदेशान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविकांना योजनेशी संबंधीत नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येवु नये, अशा सक्त सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने शासन परिपत्रकान्वये अंगणवाडी कर्मचारी यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्यतिरिक्त इतर कोणतेही काम देण्यात येवु नये अशा सुचना निर्गमित केलेल्या आहेत. लोहारा तहसिल

कार्यालयात अंगणवाडी सेविकांना बोलावुन त्यांची बैठक घेवुन त्यांना मतदार यादी पुरनिक्षण करण्याचे आदेशीत केले जात आहे. तसेच त्यांची सहाय्यक बी.एल.ओ. म्हणुन नेमनुक केली जात आहे. तसे आदेश संबंधीत अंगणवाडी सेविकांना निर्गमित करण्यात आले आहेत. खातेबाहय कामे अंगणवाडी सेविकांना सांगण्यात येवु नये, यासंबंधी भारत सरकार व राज्य सरकारचे आदेश आहेत. त्याचे पालन करावे व अंगणवाडी सेविकांना असे खातेबाहय कामे सांगु नयेत. अंगणवाडी सेविकांना सहाय्यक बि.एल.ओ.च्या कामाचे काढलेले आदेश त्वरीत रदद करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. सदरील आदेश रद्द न केल्यास जिल्हाभर, राज्यभर तीव्र आंदोलन केले जातील असा ईशारा यावेळी देण्यात आला.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर ० ते ६ वयोगटातील बालकांची जबाबदारी आहे. तसेच गर्भवती व स्तनदा माता यांना पुरक पोषण आहार पुरवणे, आरोग्य तपासणी व लसीकरण तसेच बालकांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवादवारे पार पाडावी लागते. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संबंधित विभागाने अंगणवाडी सेविकांना इतर खाते बाह्य कामे देण्यात येऊ नये असे सांगितले आहे. त्यामुळे तात्काळ हा आदेश रद्द करण्यात यावा.
भगवानराव देशमुख
प्रदेशाध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघ







