प्रतिनिधी / लोहारा
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार लोहारा येथील सर्पमित्र तथा नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर यांना जाहीर झाला आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांना अकादमीच्या राज्यस्तरीय गुणिजण गौरव महापरिषद २०२१ अंतर्गत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. नगरसेवक फुलसुंदर हे निसर्गसंवर्धन, पर्यावरण या क्षेत्रात मागील काही वर्षापासून कार्यरत आहेत. विशेेष करून आतापर्यंत त्यांनी मानवी वसाहतीमध्ये आलेल्या सुमारे दीड हजार सापांना पकडून जंगलात सोडून त्यांचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने राज्यस्तरीय कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. अकादमीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी शनिवारी (दि.१६) या पुरस्काराची घोषणा केली आहे. दि. ३१ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नगरसेवक फुलसुंदर यांचे अभिनंदन होत आहे.