वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपल्याने उमरगा उपविभागीय अधिकारी यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून काढण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी शुक्रवारी (दि. ७) लोहारा नगरपंचायतच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.
लोहारा नगरपंचायत संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आदेश काढण्यात आला होता. या आदेशात म्हणले होते की, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ४० (१) नुसार नगरपंचायतची मुदत ही पहिल्या सभेसाठी नेमून दिलेल्या तारखेपासून पाच वर्षांच्या मुदती पर्यंत चालू राहील असे नमूद आहे. त्यानुसार लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत ही दि. ६ मे २०२१ रोजी संपत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी उमरगा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले होते. या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी शुक्रवारी ( दि. ७) नगरपंचायतच्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला. नगराध्यक्षा ज्योती मुळे यांच्याकडून उपविभागीय अधिकारी उदमले यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मुख्याधिकारी गजानन शिंदे, कार्यालयीन अधिक्षक जगदीश सोंडगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. लोहारा (बु) नगरपंचायतची मुदत संपत आल्याने सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना, आरक्षण सोडत, प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करून त्यावर हरकती व सूचना मागविणे आदी कार्यक्रम झाले आहेत. परंतु सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर पडली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात उपाययोजना करणे आवश्यक आहे. लोहारा शहरात दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी कठोर पावले उचलून आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक आहे.
No Result
View All Result
error: Content is protected !!