वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
कोणत्याही आपत्ती किंवा संकटाच्या काळात आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी, सकारात्मक व भयमुक्त ठेवणे आवश्यक असते. त्याच अनुषंगाने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांवर सल्ला आणि जागरूकता होणे आवश्यक आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना समुपदेशन हेल्पलाइन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीत प्रशासनाकडून विविध उपाययोजना व जनजागृती करण्यात येत आहे. परंतु आपल्या परिसरातील दररोजच्या घटना, बातम्या, त्यामुळे निर्माण झालेली भिती यामुळे अनेकांचे मानसिक स्थिती बिघडत चालली आहे. अशा परिस्थितीत त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. हीच गरज ओळखून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना समुपदेशन हेल्पलाइन सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट अहमदाबाद व एचडीएफसी बँक परिवर्तन सीएसआर यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना समुपदेशन हेल्पलाईन ची सुरुवात जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक स्वतंत्र अनुभवी व तज्ञ समुपदेशक नेमण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त व स्थलांतरित कामगारांचा म्हणून ओळखला जात असला तरी हा जिल्हा संवेदनशील आहे. याठिकाणी सामाजिक मनोवैज्ञानिक समुपदेशनाची गरज आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरीकांना शासकीय सोयी, सुविधा व योजनांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी या समुपदेशन हेल्पलाइन ची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी यावेळी सांगितले. टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईचे संचालक प्रा. शालिनी भरत यांनी राष्ट्रीय आपत्ती नियोजनातील अनुभवाच्या मदतीने झोकून काम करू आणि उस्मानाबाद जिल्ह्याची कोविड काळातील परिस्थिती सामान्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी कोहिजन फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे ग्वाही फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले. या उपक्रमास सर्वतोपरी आर्थिक सहयोग देण्याचे आश्वासन एचडीएफसी परिवर्तन सीएसआर प्रमुख रितेश सिन्हा यांनी दिले.
कोरोनाच्या या परिस्थितीत आपणास भीती वाटतेय?, झोप येत नाही?, कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास काय करावे, कुणाशी बोलावे, तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तर काळजी करू नका आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एका समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत समुपदेशन करण्यात येणार आहे. हेल्पलाईन ला संपर्क करण्यासाठी खालीलप्रमाणे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
उस्मानाबाद – सोनाली गुजराथी ( ७४९८७०१७७९),
तुळजापूर – मनोहर दावणे ( ८७८८५३४७७०),
उमरगा – किरण कदम ( ९३७३८२७११५),
लोहारा – शुभांगी कुलकर्णी ( ८०८०२३४३२४),
परांडा – आनंद भालेराव ( ७६६६२९९६१७),
भूम – शंकर ठाकरे ( ७६६६२८४३०३
कळंब – गणेश चादरे ( ७६६६२९०६३६),
वाशी – सोनाली गुजराथी ( ७४९८७०१७७९)