वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक वृत्त आहे. परंतु तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या या भीषण परिस्थितीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. असे असले तरी तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी तालुकावासीयांनी पुढील आणखी काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मंगळवारी ( दि. ६) आलेल्या अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जेवळी येथील ३ तर कानेगाव, पांढरी येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात ४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील ३८ जणांचा समावेश आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोहारा तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यादरम्यान तालुक्यातील सर्वच गावात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे लोहारा शहरातील दोन कोविड सेंटरसह तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील अनेक दिवस शासनाने कडक निर्बंध लावले होते. सध्या त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. लोहारा तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आणखी पुढील काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.