वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. कोरोनाच्या या भयंकर आजारापासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान आत्तापर्यंत तालुक्यातील ३१ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे. कोरोनापासून स्वतःचाबचाव करण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
लोहारा तालुक्यात दि. २ एप्रिल २०२० ला तालुक्यातील धानुरी येथे कोरोनाबाधित पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळू हळू रुग्णसंख्या वाढत गेली. सुरुवातीच्या काळात तालुक्यात खूप कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत होते. परंतु त्यानंतर काही दिवसांनी दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत गेली. यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता कोरोनाला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागासह प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत होते. सर्वत्र रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासकीय यंत्रणेवरही प्रचंड ताण वाढत होता. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होण्यापासून ते दवाखान्यात खाट उपलब्ध होण्यासाठी रूग्णाला तसेच प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. मागील दोन महिन्यात तर रुग्ण संख्या झपाट्याने वाढत चालली होती. आता ती हळू हळू कमी होत आहे. कोरोनाच्या या भीषण संकटापासून बचाव होण्यासाठी शासनाने लसीकरण मोहीम सुरू केली. सुरुवातीला नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. परंतु त्यानंतर काही दिवसांनी लसीकरणास प्रतिसाद दिला. नागरिकांनी लस घ्यावी यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील ३१.१ टक्के नागरिकांनी लस घेतली आहे.
लोहारा तालुक्यातील दोन ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याच्या माध्यमातून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. तालुक्यात ६० वर्षांवरील ११ हजार ५१० नागरिकांपैकी ८ हजार ८०६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर १ हजार ७५८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० वयोगटातील एकूण २३ हजार ९५ नागरिकांपैकी ८ हजार ८५६ नागरिकांनी पहिला डोस तर १७६४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयोगटातील ४८ हजार ९० नागरिकांपैकी ७ हजार २५८ नागरिकांनी पहिला तर १ हजार ४३१ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. इतर दुर्धर आजार आलेल्या तालुक्यातील १२१३ नागरिकांपैकी ११९१ नागरिकांनी लसीचा पहिला डोस तर ८७७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे तालुक्यातील ८३९०८ नागरिकांपैकी २६ हजार १११ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे तर ५८३० नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.सद्यस्थितीत लोहारा तालुक्यात लसीकरणास म्हणावा तसा प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. लोहारा तालुक्यात सध्या कोविशील्ड व कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. ऑनलाइन स्लॉट बुकिंग व ऑनस्पॉट नोंदणी या दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे. कसलीही भीती न बाळगता जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी. डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी