वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना देणे व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा उद्देश ठेवून आय सिड संस्थेने माकणी येथे ‘वीज साक्षरता’ व आकाश कंदील बनवणे कार्यशाळेचे आयोजन केले होते. ‘आकाश कंदील बनवणे कार्यशाळेचे’ साधन व्यक्ती संस्थेचे संस्थापक विष्णू शिंदे हे होते. विविध कल्पक प्रयोग करून विद्यार्थ्यांनी आकाश कंदील बनवले व यावर्षीही पैशाची बचत केली.
‘वीज साक्षरता’ कार्यशाळेकरिता साधनव्यक्ती म्हणून पुणे येथील नामांकित महाविद्यालयातुन इलेक्ट्रॉनिक अभियंता पदवी प्राप्त व एस ब्रो क्रियेशन कंपनीचे संचालक शुभम उबाळे तसेच त्यांचे सहकारी पूजा गुरुस्थळे, मोलश्री फुलझेले, शुभम शिंदे हे होते. त्यांनी विविध प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना वीज निर्मिती, वीज बचत, विजेपासून स्वतःचे संरक्षण, विजेपासुन होणारे आविष्कार तसेच त्यांनी तयार केलेले रोबोट, सोलार पॅनेल, सेन्सर मशीन इ. माहीती दिली. सदर कार्यशाळा मुलांसाठी नवीन मेजवानीच होती. मुलांनी तब्बल तीन तास याचा आनंद लुटला.या कार्यशाळेसाठी आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी, स्पेरुल फाउंडेशन पुणेचे कन्ट्री हेड व डी. के. हेल्थकेअरचे संस्थापक दयानंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोणतेही यश कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे केवळ चमकणाऱ्या तात्काळ गोष्टीकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांनी कष्ट करावे असे प्रतिपादन दयानंद पाटील यांनी केले. तसेच आय सिड संस्थेचे अभिनंदन केले. आय सीड संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी या प्रकारच्या कार्यशाळांचे आयोजन करणे म्हणजे या विद्यार्थ्यांना दिवाळीची मौल्यवान भेटच आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य खूप उज्वल असणार आहे हे मात्र नक्की असे प्रतिपादन गौरीशंकर कलशेट्टी यांनी केले. संस्थेची विद्यार्थीनी लक्ष्मी शिंदे हिने सूत्रसंचालन केले. शकील सय्यद, दिग्विजय कांबळे, अमोल रसाळ, रोहित वाघमारे आदी उपस्थित होते. आय सीडचे कार्यकारी संचालक महेश शिंदे यांनी कार्यशाळेचा समारोप केला.
आय सीड संस्था माकणी येथे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील विद्यार्थी सद्यस्थित शाळाबाह्य होऊ नये याकरिता सर्वसमावेशक व सर्वांगीण शैक्षणिक विकासाची कामे लोकसहभागातून करत आहे. याकरिता संस्थेने अनेक शाश्वत उपक्रम हाती घेतले आहेत. याअंतर्गत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी ठेऊन मोफत अभ्यासावर्ग, विविध शिबिरे व सत्रांचे तसेच मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य सदृढ राहावे याकरिता क्रीडा प्रकारांची आयोजन करत आहेत.