वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
हॅलो मेडिकल फाउंडेशन, जिल्हा महिला व बालविकास उस्मानाबाद व सखी वन स्टॉफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने निर्धार समानतेचा अभियान २०२१ अभियानांतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत लोहारा तालुक्यात विविध गावात नाटिका सादरीकरण करून जनजागृती करण्यात आली आहे.
हॅलो मेडिकल फाउंडेशन, जिल्हा महिला व बालविकास उस्मानाबाद व सखी वन स्टॉफ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते २५ डिसेंबर या कालावधीत निर्धार समानतेचा २०२१ हे अभियान राबविण्यात येत आहे. महिलावरील कौटुंबिक हिंसा, बालविवाह, हुंडा, मुलीचे शिक्षण याविषयी गावसभा, महिला व पुरुष गट बैठका, युवक किशोरी मुलींच्या बैठका, खेळ गाणी मार्गदर्शन, व्याख्यान, सायकल रॅली, प्रभात फेरी आदींच्या माध्यमातून लोकांचे वरील विषयावर लक्ष केंद्रित करून बालविवाह, हुंडा व महिलांवरील हिंसा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच या विषयावर जनजागृती व्हावी याकरिता स्वतंत्र थिएटर ग्रुप पुणे यांच्या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. लोहारा तालुक्यातील तावशीगड, एकोंडी, उंडरगाव, उदतपूर, तोरंबा तसेच लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांकडून बालविवाह, हुंडा, महिलांवरील अत्याचार यामुळे समाजात काय परिणाम होत आहेत तसेच महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार कमी होण्यासाठी काय करावे लागेल याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेक तरुण, तरुणींनी हुंडा घेणार नाही देणार नाही अशी शपथ घेतली. यावेळी बसवराज नरे, सतीश कदम, श्रीकांत कुलकर्णी, स्वाती पाटील, वासंती मुळे उपस्थित होते. तसेच निर्धार समानतेचा अभियान राबविण्यासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.———-
या अभियानामुळे बालविवाह, हुंडा आदींचे प्रमाण कमी होऊन महिलांवरील अत्याचार थांबेल. तसेच स्त्री पुरुषामध्ये समानता वाढेल व प्रत्येक गाव हिंसामुक्त, हुंडामुक्त होईल.
सतीश कदम,
तालुका समन्वयक,
हॅलो मेडिकल फाउंडेशन