वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाड्यातील तरुणांना सैन्यदलात मोठ्या प्रमाणात नौकरीच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठवाड्यात येत्या एक वर्षात ११ ठिकाणी डिफेन्स अकॅडमी सुरू करून याव्दारे मराठवाड्यातील तरुणांना ही संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.
दि.२२ फेब्रुवारी रोजी माळकोंडजी पाटी (ता.औसा) येथील क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडमीच्या माहिती संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विवेक भोसले, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, विनायक भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. अंकुश नाडे , मातोळा गावचे सरपंच बालाजी सूर्यवंशी, माळकोंडजीचे माजी सरपंच संजय कुलकर्णी, प्रवीण कोपरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, गोरख सावंत, संतोष आनंदगावकर, जगदिश पाटील, नामदेव माने आदी उपस्थित होते.यावेळी आमदार सतीश चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्रातील सुमारे अठरा लाख तरुणांनी नौकरीसाठी एम्प्लॉयमेंट कार्यालयात नोंदणी केली आहे. मात्र सरकारने ठरवले तरीही ऐवढया मोठ्या प्रमाणात तरुणांना नौकरी देवू शकत नाहीत. या उलट संरक्षण खात्यात मुलांना नौकरीची सुवर्ण संधी आहे. याकडे मराठवाड्यातील तरुणांचे दुर्लक्ष असून शहरी भागातील मुलांपेक्षा ग्रामीण भागातील मुले शारीरिक दृष्टीने तंदुरुस्त असतात. यामुळे ग्रामीण भागात या डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा आपला मानस असून मराठवाड्यातील ग्रामीण भागात एका वर्षात अकरा डिफेन्स अकॅडमी सुरू करणार असून यामधून प्रतिवर्षी अकरा हजार तरुण या अकॅडमी मधून बाहेर पडतील अशी माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विवेक भोसले यांनी तर सुत्रसंचालन नामदेव माने व प्रा. अंकुश नाडे यांनी आभार मानले.