वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कधी मध्यम तर कधी संततधार पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पिकात पाणी थांबून पिके पिवळी पडून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा एक महिना तालुक्यातील काही भाग वगळता बहुतांश ठिकाणी म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे तालुक्यात ५० टक्केच पेरणी झाली होती. परंतु जुलै महिन्यात सलग सहा सात दिवस दररोज मध्यम, संततधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर अनेकांनी पेरणी उरकली. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी सर्वात जास्त झाली आहे. परंतु सोयाबीनच्या कोवळ्या पानांवर गोगलगाय व अळ्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सुरुवातीला तालुक्यातील मोजक्या दोन चार शिवारात गोगलगायीची समस्या असेल असे वाटत होते. परंतु तालुक्यातील अनेक शेतकरी या समस्येमुळे चिंतेत असल्याचे शेतकरी सांगत होते. सोयाबीन पिकांवर गोगलगाय व अळीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीनच्या पानावर छिद्र पडल्याचे चित्र आहे. तसेच गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे कोंबच फस्त होत आहे. त्यामुळे आपल्या शेतातील गोगलगायीची समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अनेक उपाय करण्यात येत आहेत. हे उपाय खर्चिक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता.
मागील तीन चार दिवसांत तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील अचलेर, आष्टा कासार, माकणी, सास्तुर भागात तर सततच्या पावसाने शेतकरी हैराण झाले आहेत. तालुक्यातील बहुतांश भागात झालेल्या जोरदार पावसाने ओढे, नाले प्रवाहित झाले आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकात पाणी थांबले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. यावर्षी शेतकऱ्यांवर संकटांवर संकटे येत आहेत. सुरुवातीला गोगलगाय व अळ्यांचा प्रादुर्भाव तर आता पावसामुळे पिके धोक्यात आली आहेत. मागील काही दिवसांपासुन पाऊस सुरु आहे. मोठ्या स्वरुपात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पीक पुर्णपणे पाण्याखाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ पुर्णपणे खुंटली. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.
———-
माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प ७५ टक्के भरला
मागील काही दिवसांपासून लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ओढे नाले प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. हा प्रकल्प ७५ टक्के भरला आहे अशी माहिती शाखा अभियंता के. आर. येणगे यांनी दिली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पात येऊन पुढील काही दिवसांत हा प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.
———–
आष्टाकासार परिसरामध्ये मागील काही दिवसांपासुन पाऊस सुरु आहे. मोठ्या स्वरुपात झालेल्या पावसामुळे सोयाबीन पीक पुर्णपणे पाण्याखाली आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ पुर्णपणे खुंटली असुन शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी.
ब्रम्हा सोमवंशी,
शेतकरी आष्टाकासार