वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विश्वराज फाउंडेशन मार्फत भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचायती द्वारे घेण्यात आलेले विधवा प्रथा बंदी ठराव शुक्रवारी (दि.२) जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना सुपूर्द करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राज्यात सर्वप्रथम या प्रथेविरोधात ठराव घेऊन स्त्रीमुक्ती लढ्यात एक महत्वाचे पाऊल उचलले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत एक पाऊल पुढे जाऊन शासनाच्या वतीने दि. १७ मे २०२२ रोजी एक परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना यासबंधीचा ठराव घेण्यासंदर्भात आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत भूम, परंडा, वाशी मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या विश्वराज फाउंडेशनच्या वतीने गावपातळीवर जनजागृती करण्यात आली होती.
त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत तब्बल १०० ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंदी बाबत ठराव घेण्यात आले आहेत. ते सर्व ठराव शुक्रवारी (दि.२) जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना रीतसर सुपूर्द करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी मराठवाडा (लातूर विभाग) अध्यक्षा वैशालीताई राहुल मोटे यांनी सांगितले आहे. यावेळी विश्वराज फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमोल औताडे, उपाध्यक्ष आमीर शेख, सचिव पांडुरंग देवळकर, दादासाहेब गायकवाड, डॉ सूरज मोटे, मयूर जाधव, प्रदीप शेळके, जयंत यादव, अमोल घोळवे, अविनाश आटोळे, उदयसिंह राजे जाधव, श्रावण आसलकर, सचिन पाटील, बालाजी गटकळ, किरण सुरवसे, संपत काटवटे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.