उस्मानाबाद: जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, जिल्हा एकविध क्रीडा संघटना आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.३१) एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी सरदार पटेल यांनी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा, सरदार पटेल यांची कामगिरी सर्व स्तरातील जनतेला प्रेरणादायी ठरावी या उद्देशाने त्यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरा करावयाचा निर्णय सरकारने घेतला आहे.त्या अनुषंगानेच या एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली आणि राष्ट्रीय एकता दौडला निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. श्री.तुळजाभवानी क्रीडा संकुल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, समता नगर या मार्गाने ही दौड घेण्यात आली. यामध्ये विविध सरकारी विभागातील अधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, लहान मुले तसेच विविध ॲकॅडमीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.
या कार्यक्रमास उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) गजानन सुसर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजेंद्र मिरगणे, तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके आदींची प्रमुख उपस्थिती होती.