वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून बेमुदत संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या बुधवारी (दि. १५) तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोरील मैदानात धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
लोहारा तालुक्यातील सर्व विभागातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. आरोग्य, शिक्षण, महसूल, पंचायत समिती, पशुसंवर्धन, भुमी अभिलेख, पाणीपुरवठा, ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.१४) पासून सुरू असलेल्या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. या कर्मचाऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. १५) लोहारा तहसिल कार्यालयाच्या समोरील मैदानात धरणे आंदोलन केले.

या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, हमारी युनियन हमारी ताकद, हम सब एक है अशा अनेक घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. यावेळी सहभागी कर्मचाऱ्यांनी संपविषयी मनोगत व्यक्त केले. हा संप आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी विकास घोडके, कमलाकर येणेगुरे, सुदर्शन जावळे, एम.टी. जगताप भागवत गायकवाड, ज्योती पाटील, सुनंदा निर्मळे, बालाजी साठे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती संघटना समन्वय समितीचा निर्णय येईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी एकमुखी मान्य केला. या आंदोलनात सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात माधव जाधव, बालाजी चामे, उमाशंकर कलशेट्टी, भागवत गायकवाड, वजीर अत्तार, महेश क्षीरसागर, विकास घोडके, शशांक पाटील, गणेश वाघमारे, राजू जट्टे, अभिजित गायकवाड, घनश्याम कोकाटे, श्री. येरटे, श्री. मुदिराज, युनूस शेख यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.





