वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील भातागळी येथील मानाच्या काठीचे दि. २५ मार्चला शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान झाले होते. या मानाच्या काठीचे गुरुवारी (दि. ६) रात्री दहाच्या सुमारास भातागळी गावात आगमन झाले. यावेळी गावकऱ्यांनी या मानाच्या काठीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
तालुक्यातील भातागळी येथील मानाची काठी भाविकासह कटल्या, नंदी, कावड इत्यादींच्या सोबत दि. २५ मार्चला शिखर शिंगणापूरकडे रवाना झाली होती. भातागळी ते शिखर शिंगणापूर हे जवळपास ३०० किमी चे अंतर पार करत ३० मार्च रोजी ही काठी शिखर शिंगणापूर मध्ये पोहोचली. शिखर शिंगणापूर येथील महादेवाच्या मुख्य मंदिरात काठीचा विवाह सोहळा संपन्न झाला. शिखर शिंगणापूरमध्ये भातागळीच्या महादेवाच्या काठीला विशेष असा मान आहे. भातागळीची काठी ही शंभू महादेवाची अर्धांगिनी अर्थात पार्वतीचे रूप मानले जाते. भातागळी गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी या काठीला अर्थात नवरीला सजवले जाते. तिची मनो भावे पूजा केली जाते. भातागळी गावात एकाही घरावरती गुढी न उभारता काठी हीच सार्वजनिक गुढी उभी केली जाते. पाडव्यानंतर तीन दिवस काठी महादेवाच्या मंदिरामध्ये उभी असते. परिसरातील व गावातील नागरिक दररोज मनोभावे पूजा अर्चा, भजन, करतात तसेच दररोज संध्याकाळी काठीची प्रत्येक समाजाकडून आरती केली जाते.
काठी शिखर शिंगणापूरमध्ये पोहोचल्यानंतर एक दिवस मुक्कामी होती. तसेच परतीचा सहा दिवसाचा प्रवास करून या काठीचे लोहारा तालुक्यातील आरणी येथे गुरुवारी (दि. ६) सायंकाळी सातच्या सुमारास आगमन झाले. त्यानंतर कानेगाव मार्गे ही काठी भातागळी गावामध्ये रात्री दहाच्या सुमारास आली. त्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या काठीचे स्वागत केले. काठीचे गावात आगमन झाल्यानंतर भातागळी गावच्या यात्रेला प्रारंभ होतो. सात व आठ एप्रिल रोजी ही यात्रा आहे. दरम्यान सात व आठ एप्रिलला भातागळी फेस्टिवल अंतर्गत राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून राज्यातील विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
भातागळी येथे शंभू महादेवाची सात व आठ एप्रिलला भव्य अशी यात्रा असून ही यात्रा वाढावी यासाठी भातागळी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रौढ गट समूह, मोठा गट वैयक्तिक, बालगट समूह, बालगट वैयक्तिक, लावणी, खुला वैयक्तिक, युगल गट, वैयक्तिक या प्रमाणे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी एकूण १ लाख ५१ हजार रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली असून विजेत्या स्पर्धकांना गटनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच विजेत्या संघास ट्रॉफी व द्वितीय, तृतीय संघास चषक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा मागील काही वर्षे बंद होती. आता पुन्हा एकदा स्पर्धा सुरू करण्यात आली असल्याने भातागळी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भातागळीची ही नृत्य स्पर्धा राज्यातल्या स्पर्धकासाठी आकर्षणाचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पार पडते. यासाठी भातागळीच्या स्पर्धेचा नावलौकिक आहे.
स्पर्धकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था समितीच्या माध्यमातून मोफत करण्यात आलेली आहे. सात एप्रिल रोजी बाल गट समूह, बालगट वैयक्तिक, लावणी खुला वैयक्तिक मुलीसाठी वय वर्ष १४ पर्यंत तसेच युगल गट वैयक्तिक वय वर्ष १४ पर्यंत याची स्पर्धा होईल. तसेच आठ एप्रिल रोजी प्रौढ गट समूह मोठा गट वैयक्तिक लावणी खुला वैयक्तिक १४ वर्षापासून पुढे मुलीसाठी, युगल गट वैयक्तिक १४ वर्षापासून पुढे या प्रकारच्या स्पर्धा होतील. जास्तीत जास्त स्पर्धकांनी व संघानी या राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन फेस्टिवल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.