वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आरणी येथील शेकडो ग्रामस्थ नवीन शिधापत्रिका, नाव कमी करणे, नाव समाविष्ट करणे, दुय्यम शिधापत्रिका मिळणे यासह आदी हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे लोहारा तहसील कार्यालयाच्या वतीने आरणी येथे विशेष शिबीर आयोजित करुन पात्र लाभार्थ्यांना शिधा पत्रिकेचे वाटप करावे अशी मागणी सरपंच सविता संगशेट्टी व उपसरपंच सिद्धेश्वर लादे यांनी सोमवारी (दि.१७) तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील आरणी येथील शेकडो ग्रामस्थांकडे रेशनकार्ड (शिधा पत्रिका) उपलब्ध नसल्याने स्वस्त धान्यसह विविध योजनेपासून अनेकांना वंचित रहावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावात तहसील कार्यालयाच्या वतीने विशेष शिबीर घेऊन पात्र लाभार्थ्यांना शिधा पत्रिका वाटप करण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्यानुसार लोहारा तहसीलदारांनी तालुक्यातील अनेक गावांत शिबीर घेऊन रेशनकार्ड वाटप केले आहेत. परंतु आजतागायत आरणी गावात एकदाही शिबीर आयोजित न केल्याने येथील शेकडो नागरिक हक्काच्या रेशनकार्ड पासून वंचित आहेत.
त्यामुळे तहसीलदारांनी याकडे त्वरित लक्ष देऊन येत्या आठ दिवसात आरणी येथे विशेष शिबिराचे आयोजन करुन नवीन शिधा पत्रिका, दुय्यम शिधा पत्रिका, नाव दुरुस्ती, नाव कमी करणे, नाव वाढवणे यासह आदी सोई सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निवेदनात म्हणले आहे. या निवेदनावर सरपंच सविता संगशेट्टी, उपसरपंच सिद्धेश्वर लादे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.