लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.५) नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटीशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या संस्थेचे धाराशिव जिल्हा संयोजक व निसर्गमित्र श्रीनिवास माळी यांनी या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीनिवास माळी म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय व पर्यावरण संरक्षण गतिविधि यांनी ” नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटिशन ” या स्पर्धेचे देशभरातील इयत्ता १ ली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी आयोजन केले आहे. यासाठी Ecomitram हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ही एक क्विझ कॉम्पीटीशन असून या स्पर्धेसाठी नोंदणी फिस म्हणून फक्त 10 वृक्षांच्या बीजारोपण करून त्याचा फोटो अथवा सेल्फी अपलोड करावयाचे आहे. त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे दिली की 1 ॲक्टिविटी पूर्ण करायची असते. अशा प्रकारे ॲक्टिविटी व स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालया यांच्यातर्फे डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले जाते.
हर घर नर्सरी हे उपक्रम या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहचला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून बीजारोपण व पर्यावरण संरक्षण, संवर्धन या कार्यात सहभागी करून घेणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. कृपया सर्व पालकांनी आपल्या पाल्यास या स्पर्धेसाठी नावनोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी पालकांना केले. याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, सोमनाथ कुसळकर, पूजा चौरे, माधवी होगाडे, सरिता पवार यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.