लोहारा Lohara) तालुक्यातील एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपलब्ध सुविधांचा योग्य वापर करून शाळेच्या परिसरात सुंदर परसबाग विकसित करण्यात आली असून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून परसबागेतील विविध झाडे व पिकांना नियमित पाणी देण्यात येत आहे. तसेच शाळेच्या परिसरातील झाडांचे संवर्धन करून पर्यावरण संरक्षणाचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र आयलाने व शिक्षक वनराज सूर्यवंशी, प्रदीपकुमार गुडले, प्रतिभा येदले, सुश्मिता मलकलपट्टे आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि श्रमसंस्कार रुजावेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत असून त्यातून विद्यार्थी गुणवत्ता, शालेय इमारत, वर्गखोल्या सजावट, डिजिटल शिक्षण, सुसज्ज संगणक कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी, व इतर भौतिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. उन्हाळ्यात तसेच सुट्टीच्या काळातही झाडांना नियमित पाणी मिळावे यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयकडून करण्यात आली आहे. मुला-मुलीसाठी स्वतंत्र असे स्वच्छ व सुंदर असे सर्व सुविधायुक्त शौचालय ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून तयार करण्यात आले आहे.

शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे, फुलझाडे, फळझाडे, सुंदर असा लॉन्स तसेच भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनाही या परसबागेच्या संगोपनात सहभागी करून घेतले जात असून, त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजत आहे. मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे शाळेचा परिसर हिरवाईने नटला असून, ‘झाडे जगवा, पर्यावरण वाचवा’ हा संदेश कृतीतून देण्यात येत आहे. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.





