लोहारा शहर व परिसरात शनिवारी (दि.२०) दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील बहुतांश ठिकाणी नुकसान झाले आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच शेतातील ज्वारीच्या कडब्याचेही नुकसान झाले आहे. त्यात शनिवारी (दि.२०) दुपारी अचानकपणे वातावरणात बदल झाला. दुपारी एकच्या सुमारास सर्वत्र काळोख पसरल्यासारखे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वादळी वारा व विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. लोहारा शहरासह तालुक्यातील भातागळी, माकणी, हराळी, सालेगाव, सास्तुर, उदतपुर, कानेगाव, जेवळी, आष्टाकासार, तावशीगड यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जवळपास तीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. अचानकपणे सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच यात शेतातील झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाल्याचे नागरिकांनी सांगितले. एकंदरीत या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी नुकसान झाले आहे. सायंकाळी सहा पर्यंत अनेक ठिकाणी अधून मधून रिमझिम पाऊस सुरूच होता. दरम्यान दुपारच्या अवकाळी पावसात वीज पडून कानेगाव येथील पांडुरंग लोभे यांच्या शेतात झाडाखाली बांधलेल्या तीन म्हशींचा मृत्यू झाला आहे. तसेच माळेगाव येथील सुभाष कुंभार यांच्या बैलावर वीज पडून मृत्यू झाला आहे. या दरम्यान शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री १२ च्या सुमारास वीजपुरवठा सुरू झाला.