कोलकत्ता व बदलापूर प्रकरणातील आरोपीचा तात्काळ शोध घेऊन कडक शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेच्या वतीने लोहारा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की दि. ९ ऑगस्ट रोजी कोलकत्ता शहरात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. दि. १२,१३ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई शहरातील बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. राज्यात व देशात अनेक ठिकाणी सातत्याने महिला व मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, निष्पाप जीवांची व त्यांच्या भावनांची फरफट करणाऱ्या घटना घडत आहेत. अशा अमानुष ह्रदयद्रावक घटनांचा हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्था तीव्र निषेध करीत आहे. असे कृत्य करणाऱ्या नराधमांवर योग्य ती कडक कार्यवाही त्वरित झाली पाहिजे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर संस्थेचे प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, सहाय्यक समन्वयक सतिश कदम, नागिणी सुरवसे, समुपदेशीका वासंती मुळे, श्रीराम जाधव, स्वाती पाटील, प्रणिता भोसले, सोपान सुरवसे, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह हॅलो संस्थेच्या निर्धार समानतेचा प्रकल्पाशी जोडलेले कार्यक्षेत्रातील ४० गावातील महिला, पुरुष प्रेरक, प्रेरिका यांच्या सह्या आहेत.