१ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी (दि.१) जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध घोषणा देण्यात आल्या.
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग धाराशिव, जिल्हा रुग्णालय धाराशिव, स्पर्श उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील सास्तूर गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाचे प्रकल्पाधिकारी आर.बी. जोशी, वैद्यकीय अधिकारी ए.आर.टी.विभागाचे डॉ. सत्यम गुरुडे, स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ. भक्तराज ठोंबरे, डॉ. गणेश मरलापल्ले, डॉ. अरबाज पटेल, अच्युत आदटराव तसेच सास्तुर येथील श्री शान्तेश्वर विद्यालयातील प्राध्यापक जाधव सर, प्राध्यापक पाटील सर, क्षयरोग विभागाचे ज्ञानेश्वर बिराजदार यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. सास्तुर येथील स्पर्श उपजिल्हा रुग्णाल्यातील सर्व कर्मचारी, शांतेश्वर विद्यालयातील विद्यार्थी, सास्तूर गावातील आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत “आधी तपासणी रक्ताची, मग सुपारी लग्नाची”, “एड्सची मैना करी जीवाची दैना”, “नारी शक्ती करे पुकार एचआयव्ही एड्स हद्दपार” आदी घोषणा देण्यात आल्या.

प्रास्ताविकपर भाषणात स्पर्श जिल्हा रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता कशी करावी, रोगराई पासून आपला तसेच आपल्या कुटुंबीयांचा बचाव कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक व्यक्तींनी आपली बिपी, शुगर, कॅन्सर इत्यादींची तपासणी वेळोवेळी सरकारी दवाखान्यात करून घ्यावी. एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी असलेल्या सुविधा त्यांना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन रमाकांत जोशी यांनी केले. महाराष्ट्रात प्रत्येक सरकारी उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी दवाखान्यात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी लोकांनी/ लाभार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची भीती, शंका न बाळगता स्वतःची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी असे आवाहन स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीटीसी समुपदेशक दीपा पवार यांनी केले. तसेच मुलांच्या लग्नाच्या अगोदर प्रत्येकाने स्वतःची एचआयव्ही तपासणी करून घ्यावी ह्याबाबत मार्गदर्शन केले. दिपा पवार यांनी एचआयव्ही एड्स बाबतच्या काही हेल्पलाइन नंबर आहेत. त्याविषयी माहिती दिली. एचआयव्ही विषयी लोकांच्या मनात किती गैरसमज आहेत ते कमी करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येत आहे. याबाबतही माहिती दिली.
त्यानंतर स्पर्श उपजिल्हा रुग्णालयाच्या एआरटी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यम गुरुडे यांनी एआरटी विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यामध्ये औषध उपचार घेण्यामुळे एचआयव्ही संसर्गित व्यक्ती सर्वसामान्यप्रमाणे चांगल्या प्रकारे जीवन जगू शकते यावर ही मार्गदर्शन केले. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील क्षयरोग विभागाचे ज्ञानेश्वर बिराजदार यांनी टीबी मुक्त भारत होण्यासाठी क्षयरोगाची तपासणी करून घ्यावी तसेच क्षयरोगाची लक्षणे कोणती याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा पवार यांनी केले.















