लोहारा शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भानुदासराव चव्हाण महाविद्यालयास नॅकच्या पहील्याच मुल्यांकनात २.६ गुणांसह B+ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून पहिल्याच पाच वर्षात नॅकला सामोरे जाणारे ग्रामीण भागातील देशातील पहिले महाविद्यालय ठरले असल्याची शक्यता शैक्षणिक क्षेत्रात वर्तवली जात आहे. महाविद्यालयाच्या पहिल्या मूल्यांकनासाठी दि. ३० व ३१ जानेवारी २०२४ रोजी नॅक बेंगलोरच्या वतीने तीन सदस्यीय समितीने महाविद्यालयास भेट दिली होती. यावेळेस नवीन फॉरमॅट नुसार महाविद्यालय नॅकला सामोरे गेले. यासाठी समितीचे चेअरमन म्हणून कर्नाटक येथील म्हैसुर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर जी. हेमंता कुमार, समन्वयक सदस्य म्हूणन केंद्रीय विद्यापीठ, काश्मिरचे अधिष्ठाता प्रो. डॉ. सय्यद झहूर अहमद जीलानी तर सदस्य म्हणून जिल्हा अरंतथागी, तामिळनाडू येथील नैना मोहम्मद आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य थिरूचिवेलम चिन्नयन हे होते. प्रथम महाविद्यालयाच्या वतीने प्रवेशद्वारा जवळ समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व समिती सदस्यांना विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालात आतील प्रवेशद्वारा जवळ आणले. एन. सी. सी. कॅडेट्सनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर करून मानवंदना केली. तदनंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने मुलांनी फेटे बांधून व मुलींनी औक्षण करून तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन रितसर स्वागत केले. याप्रसंगी स्व. भानुदासराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी पूर्ण महाविद्यालयाच्या पाच वर्षाच्या कामकाजाचे सादरीकरण केले. त्यानंतर सदर समितीने महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य विभाग, अद्ययावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, औषधी वनस्पती उद्यान, वर्मी कंपोस्ट प्रकल्प, क्रीडा विभाग, कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सेल, महिला तक्रार निवारण समिती, अटल इन्क्युबेशनचे सॅटेलाईट सेंटर, डिजिटल कलासरूम, यशवंतराव चव्हाण सभागृह इत्यादींना भेट देऊन महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सर्व सोयीसुविधांची इतंभूत माहिती घेतली. त्यानंतर महाविद्यालयाची प्रशासकीय कार्यप्रणाली, अंतर्गत मूल्यांकन व गुणवत्ता निर्धारण कक्षाची कार्यप्रणाली, उत्तमोत्तम लोकाभिमुख, समाजाभिमुख उपक्रम यांचा आढावा घेण्यात आला. यासाठी महाविद्यालयाचे नॅक समन्वयक डॉ. प्रशांत माने यांनी आपले सादरीकरण करून महाविद्यालयातील विविध उपक्रमाचे सादरीकरण केले. सायंकाळी पाच वाजता सांस्कृतिक विभागाच्या वतीने समितीसमोर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वागतगीत, कोळीनृत्य, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, शास्त्रीय सुरवाद्य, शास्त्रीय तालवाद्य, मल्हार गीते, गोंधळ, पोवाडा, आंबेडकरी जलसा, देशभक्तीपर गीते, भरतनाट्यम नृत्य अशा विविध कला आविष्काराचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची व संपूर्ण देशाची संस्कृती समितीसमोर मांडली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांचा सर्व सदस्यांनी मनमुरादपणे आस्वाद घेऊन कौतुक केले.
त्यानंतर दि. ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी भातगळी येथे महाविद्यालय विस्तार कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या वृक्षारोपण, ठिबक सिंचन, सोलर लाईट, उपलब्ध करून देण्यात आलेले बेंचेस इ. कामाची पाहणी समितीने केली. दुपारी दोन वाजता माजी विद्यार्थी, पालक व आजी विद्यार्थी यांच्याशी बैठक घेऊन संवाद साधला. तसेच महाविद्यालयातील उर्वरित विभागांना भेटी दिल्या. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांच्यासोबत नॅक समितीने एक्झिट मीटिंग घेऊन महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाबाबत गोपनीय अहवाल बंद पाकीटात प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांच्याकडे सादर केला. याप्रसंगी सदर समितीचे चेअरमन प्रो. जी. हेमंता कुमार यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या प्रगती बाबत अभिनंदन करून आपली भेट यशस्वी झाल्याचे नमूद केले तसेच इतरही दोन सदस्यांनी महाविद्यालयाच्या पाच वर्षातील कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून काही महत्वपूर्ण सूचना केल्या व महाविद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नॅकच्या या दोन दिवसीय भेटीस मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मानीय उपाध्यक्ष श्री. शेख सलीम व केंद्रीय कार्यकारिणी मंडळाचे सन्मानीय सदस्य श्री.त्रिंबकराव पाथ्रीकर यांची उपस्थिती होती. सदर समितीने आपला रिपोर्ट बेंगलोर कार्यालयास सादर केला. यानंतर दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी नॅकच्या वतीने महाविद्यालयाच्यां प्रथम नॅक मूल्यांकनाचा निकाल घोषित झाला. या निकालात महाविद्यालयाने २.६ गुण प्राप्त करत B+ दर्जा प्राप्त केला असून संपूर्ण देशातून ग्रामीण भागातून महाविद्यलयाच्या स्थापनेपासून पहिल्याच पाच वर्षात नॅक मूल्यांकन मिळविण्याचा मान मिळवला आहे. या यशाबद्दल डीजे व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. डिजेच्या तालावर प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी नाचुन एकमेकांना पेढे भरवुन आनंद साजरा केला. महाविद्यालयाच्या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष मा. आमदार श्री. प्रकाश (दादा) सोळंके, सरचिटणीस मा. आमदार श्री. सतीश (भाऊ) चव्हाण, सन्मानीय सदस्य श्री. प्रदीप (भाऊ) चव्हाण, श्री. दिलीप (भाऊ) चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. प्रा. श्री. सतीश इंगळे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी आर घोलकर, नॅक समन्वयक डॉ. प्रशांत माने, उपप्राचार्य अभिजित सपाटे, महाविद्यालयाचे प्राध्यापक व सर्व प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.
महाविद्यालयाच्या संपूर्ण नॅक प्रक्रियेत संस्थेचे सरचिटणीस मा. आ. सतीश (भाऊ) चव्हाण व मा. प्रदीप (भाऊ) चव्हाण यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य व मागदर्शन लाभले. देवगिरी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, प्रा. शेख साबिहा, आय. क्यू. ए. सी. कोऑर्डिनेटवर डॉ. विष्णू पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. देवगिरी महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार श्रीमती डॉ. दर्शना गांधी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. म. शि. प्र. मंडळाचे उपप्रशाकीय अधिकारी श्री. सुधीर श्रीखंडे व त्यांचे सर्व सहकारी यांचे वेळोवेळी विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले लाभले. विद्यार्थ्यांसमोर झालेल्या द्वारसभेत सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आजच्या या यशाला गवसणी घालता आली असे मत प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले तसेच आगामी काळात देखील विद्यार्थ्यांच्या हिताकरिता महाविद्यालय नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत कौशल्यावर आधारित विविध नवनवीन अभ्यासक्रम उपक्रमशील रित्या राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करेल असा आशावाद प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी व्यक्त केला.