धाराशिव दि 24 (जिमाका) इयत्ता 10 आणि इयत्ता 12 वी नंतर कोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे आहे, हे आधी निश्चित करावे. निश्चित केलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम करायची तयारी ठेवा असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिला.
24 जून रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशीव आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव यांच्या वतीने पुष्पक मंगल कार्यालय येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर व पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटक म्हणून डॉ. ओंबासे बोलत होते. यावेळी ऑनलाईन आमदार राणाजगजितसिंह पाटील तर मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,मार्गदर्शक संतोष कार्ले,संजय मगर,संतोष राऊत,पांडुरंग मोरे,संजय देशमाने,मारुती बिरादार,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे,हे निश्चित करण्यासाठी आता युट्युब व अन्य समाज माध्यमांवर माहिती उपलब्ध आहे.आज आयोजित या करिअर मार्गदर्शन शिबिराचा व रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी लाभ घ्यावा.आज आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी रोजगार मिळवणे आवश्यक आहे.आज मोठ्या प्रमाणात करिअर घडविण्याचे व रोजगार मिळविण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात मोफत उपलब्ध आहे.त्याचा लाभ देखील युवा वर्गाने घ्यावा.असे आवाहन डॉ. ओंबासे यांनी यावेळी केले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील मेळाव्यात ऑनलाइन सहभागी होऊन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले,जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी चार ठिकाणी औद्योगिक वसाहती निर्माण करून रोजगार देण्याचा प्रयत्न राहणार आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार उभारणीसाठी निधी उपलब्ध झाला आहे.त्यामधून रोजगार निर्मिती होण्यास मदत झाली आहे.आजच्या रोजगार मेळाव्यातून देखील कंपन्यात रोजगार उपलब्ध होणार आहे.ज्या कंपनीत निवड होणार आहे,तिथे मुलामुलींनी रुजू व्हावे.त्यामुळे त्या कंपनीतील कामाचा अनुभव कामी पडेल असे ते म्हणाले.
डॉ घोष म्हणाले,स्पर्धा परीक्षेसाठी पदवी आणि संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.पीएचडी,नेट सेट व करिअरच्या वेगवेगळ्या संधी आहेत.वैद्यकीय क्षेत्रात देखील संधी आहेत.पदवी घेतल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीच्या संधी आहेत.आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे आधी निश्चित केले पाहिजे. ते साध्य करण्यासाठी परिश्रमाची तयारी असली पाहिजे.परिश्रमातूनच यश गाठता येते असे ते म्हणाले.
पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी म्हणाले,या मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार तरुण-तरुणींनी सहभागी होऊन खाजगी कंपनीत रोजगाराचा लाभ घ्यावा.जिल्हा आकांक्षित आहे. जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्य गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यालयाचे विद्यार्थी,स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रवीण औताडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा कौशल्य व रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी मानले.
याप्रसंगी करिअर मार्गदर्शन शिबीरात श्री.संजय कारले यांनी दहावी-बारावी नंतर काय,श्री.गणेश चादरे- व्यक्तिमत्व विकास,श्री.सोमनाथ वाडकर यांनी स्पर्धा परीक्षेची माहिती दिली.श्री.डॉ.सुयोग अमृतराव- मुलाखती व बायोडाटा तयार करणे,श्री जावळेकर यांनी विविध योजना व महामंडळे व श्री संजय देशमाने यांनी नवीन तंत्रज्ञानावर आधारित कौशल्य व रोजगाराचा संधी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले
या मेळाव्यामध्ये रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 14 कंपन्यांनी सहभाग नोंदवला यात 992 उमेदवारांची उपस्थिती होती तसेच 505 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली या करिअर मार्गदर्शन शिबिरात 1600 उमेदवार,विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.तसेच या मेळाव्यात स्वयंरोजगाराची व कौशल्य विकासाची माहिती देण्यासाठी शासनाचे विविध आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती देण्यासाठी 13 स्टॉल लावण्यात आले होते.यात 618 उमेदवारांनी स्वयंरोजगाराच्या स्टॉलचा लाभ घेतला.या मेळाव्यासाठी पुणे,लातूर, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव येथील कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला.