लोहारा (lohara) तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात शनिवारी (दि.१४) “सायबर गुन्हे साक्षरता कार्यशाळा” घेण्यात आली.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर व क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयात सायबर गुन्हे साक्षरता कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी क्रांती वाघमारे यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी काय केले पाहिजे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे स्वरूप, महिला व मुलींना फोटो मार्फ करून ब्लॅक मेकिंग करण्याचे प्रकार कसे होतात, त्याचबरोबर फोन हॅकिंग जीमेल हॅकिंग व इतर समाज माध्यम हॅक करून आर्थिक, शारीरिक आणि मानसिक फसवणूक केली कशी केली जाते याविषयी मार्गदर्शन केले. अशा गुन्ह्यात व्यक्ती अधिक फसला जातो. बाहेर पडण्याचे मार्ग न सुचल्याने खूप मोठी हानी होते. यापासून वाचण्यासाठी आपल्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप व इंटरनेटचा आपण काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, कोणालाही ओटीपी व आपली व्यक्तिगत माहिती देऊ नये, अनोळखी लिंक्स, वेबसाईट व अनोळखी व्यक्ती यांच्यापासून सावध राहण्याचे कौशल्य आपण आत्मसात केले पाहिजे तर आणि तरच आपली फसवणूक होणार नाही. आणि अशा डिजिटल साक्षरते (Digital Literacy) मधूनच समाजातील सायबर गुन्ह्यांना आळा बसू शकेल असे सांगून क्रांती वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्यातल्या सायबर आणि इतर ऑनलाइन फसवणुकी संदर्भात जागरूकता निर्माण केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. बी. भोईटे, बी.एस. स्वामी, जी.डी. मैंदाड, ए. व्ही. जाधव, एस. के. जाधव यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.जे. मनोहर यांनी केले.