लोहारा पंचायत समिती सभागृहात बुधवारी (दि.२३) उपविभागीय अधिकारी गणेश पवार व गटविकास अधिकारी शितल खिंडे यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांची बदली झाली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांचीही बदली झाली आहे. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटविकास अधिकारी जगदेव वग्गे हे होते. यावेळी तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शितल खिंडे म्हणाल्या की, पंचायत समिती लोहारा अंतर्गत सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी माझ्या तीन वर्षाच्या कालावधीत भरपूर सहकार्य करून तालुक्याचे कामकाज जिल्ह्यामध्ये एक नंबरला ठेवण्यामध्ये मोलाचे मदत केली. सर्वांच्या प्रयत्नातून शासनाच्या सर्व योजना ग्राम पातळीवरील अगदी शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी खूप मोलाचे काम केलेले आहे असे त्या म्हणाल्या. भाषणाच्या शेवटी गटविकास अधिकारी शितल खिंडे भाऊक झाल्या होत्या. गटविकास अधिकारी खिंडे यांनी सर्वांना सोबत घेऊन चांगल्या प्रकारे कामकाज केल्याची भावना उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांनीही मनोगत व्यक्त करत सत्काराबद्दल आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव जगताप, तालुकाध्यक्ष गोविंद पाटील, सचिव तानाजी जाधव, तालुका पतसंस्था चेअरमन आशिष गोरे, रमेश वाघमारे, एम. के. बनशेट्टी, गोविंद कोकाटे, दत्तात्रय पवार, गोपाळ करदोरे, तानाजी घंटे, धनराज गोरे, विस्तार अधिकारी सतीश शेटगार, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्री. कुंभार यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती कार्यालय व विविध विभागातील कर्मचारी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय कारभारी यांनी तर गोविंद पाटील यांनी आभार मानले.


