ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला मुंबईसारख्या महानगरात मिळणारी अत्याधुनिक व तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्यसेवा थेट आपल्या गावात मोफत मिळावी या संकल्पनेतून तालुक्यातील कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, मल्हारदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नेरुळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.२६) हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई येथून थेट पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. डॉ. अजित निळे, डॉ. नमीत पडसाळे, डॉ. नंदराज मोरे, डॉ. सियाना डाबरे, डॉ.रोहीत बागलाणे या डॉक्टरांनी रुग्ण तपासणी केली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, अस्थिरोग, स्त्रीरोग व सर्वसाधारण आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे व पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे या शिबिरात आढळून आलेल्या गंभीर व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ, नवी मुंबई येथे पूर्णपणे मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे. या सामाजिक उपक्रमास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे माजी तालुका सरचिटणीस सुयशकुमार दंडगुले, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, शिवसेना तालुका उपप्रमुख परवेज तांबोळी, सुधीर पाटील, शिवाजीराव गायकवाड, काकासाहेब चव्हाण, बालाजी कोळी, बालाजी परसे, किरण चव्हाण, चिऊ काळे, अमोल कुंभार, बळीराम साबळे, गुणाबाई भंडारे, आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गावातील महिला व ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती. अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चाचे माजी तालुका सरचिटणीस सुयशकुमार दंडगुले यांनी केले. तेरणा परिवाराकडून सातत्याने अशा प्रकारचे आरोग्य शिबिरे घेऊन ग्रामीण आरोग्य सेवेचा वसा जपला जात असल्याने कास्ती बुद्रुक व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले आहेत.



